School Admission Festival to be celebrated with enthusiasm in government and aided ashram schools on June 30.
चंद्रपूर :- आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या 8 शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये मंगळवार, दि. 30 जून 2026 रोजी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नव्याने प्रवेश घेतलेल्या तसेच माजी विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी स्वागत उत्सवाच्या वातावरणात करण्यात येणार असून यावेळी विविध शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. School Admission Festival
प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विमान प्रवासासह अभ्यास सहल, उन्हाळी शिबीर, बोलका वर्ग, ब्रायटर माइंड, जेईई/नीटट प्रवेशपूर्व परीक्षा प्रशिक्षण, मिशन शिखर, मिशन शौर्य, इस्रो भेट, भारत दर्शन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र दर्शन आदी नाविन्यपूर्ण योजनांची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच प्रकल्पांतर्गत वसतिगृहांच्या गृहपालांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून 29 जूनपासून संबंधित आश्रमशाळांमध्ये मुक्कामी राहून प्रवेशोत्सवाची तयारी व आढावा घेणार आहेत. राजर्षी शाहू महाराजांचे विचार समाजाला नवी दिशा देणारे……
प्रवेशोत्सवाची सुरुवात प्रभातफेरीद्वारे जनजागृतीने होईल. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, पेन, पेन्सिल, इतर शालेय साहित्य तसेच नवीन शालेय गणवेशाचे वितरण करण्यात येईल. तसेच मागील वर्षी बोर्ड परीक्षेत प्रत्येक आश्रमशाळेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
शासकीय आश्रमशाळा, पाटण येथे प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास पालक अधिकारी म्हणून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित राहणार आहेत. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प कार्यालय कटिबद्ध असून अधिकाधिक पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश शासकीय आश्रमशाळांमध्ये करून घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.