‘Rang Bawari’ wins ‘Best of Show’ at MSEDCL’s Drama Competition
चंद्रपूर :- महावितरणच्या नागपूर प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत चंद्रपूर परिमंडलाच्या ‘रंग बावरी’ या नाटकाने उत्कृष्ट अभिनयासह सर्वोत्कृष्ट नाटकाचा मान पटकावला. दोन दिवस रंगलेल्या या नाट्यकुंभ-2025 मध्ये ‘रंग बावरी’ने विविध गटांमध्ये तब्बल सहा प्रथम पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. अकोला परिमंडलाच्या ‘सिकॅरिअस’ या नाटकाने उपविजेतेपद मिळवले. Natyakumbha 2025 MSEDCL’s Drama Competition
या स्पर्धेतील विजेत्या कलाकारांना महावितरणचे संचालक (संचलन) अरविंद भादिकर आणि संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत, मुख्य अभियंता सर्वश्री सुहास रंगारी, दिलीप दोडके, ज्ञानेश कुलकर्णी, राजेश नाईक आणि स्वागताध्यक्ष हरिश गजबे यांच्यासह नाट्य परिक्षक विनोद दुर्गेपुरोहित, जयदेव सोमनाथे, अँड. चैताली बोरकुटे यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात बोलताना संचालक अरविंद भादिकर यांनी नाट्य कलाकारांचे कौतुक केले आणि स्पर्धेनंतरही त्यांनी एकमेकांशी संवाद कायम ठेवण्याचे आवाहन केले. अपयश आले तरी निराश न होता प्रयत्न सुरू ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला. संचालक प्रसाद रेशमे म्हणाले, “जय-पराजय हा स्पर्धेचा भाग असला तरी, कलाकारांनी आपली कला सादर करताना मिळवलेला आनंद आणि रसिकांना दिलेला आनंद हेच त्यांचे खरे पारितोषिक आहे.” स्पर्धेचे अध्यक्ष तथा प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी नाटकांच्या माध्यमातून केवळ आनंदच नव्हे, तर अनेक अनुभव मिळाल्याचे मत व्यक्त केले.
नाट्यकुंभ-2025 चे उद्घाटन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते झाले होते. यावेळी बोलतांना त्यांनी महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामातील या अनमोल अनुभवांना नाट्यकृतींच्या माध्यमातून समाजासमोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महावितरण एक मोठा परिवार आहे आणि या कुटुंबातील सदस्यांमध्ये अनेक उत्कृष्ट कलागुण दडलेले आहेत. दैनंदिन कामाचा व्याप सांभाळूनही कर्मचाऱ्यांनी आपली कला जोपासली आहे, हे कौतुकास्पद आहे. ‘नाट्यकुंभ’ सारख्या स्पर्धांमुळे या कलाकारांना त्यांची प्रतिभा सादर करण्याची संधी मिळते. यासोबतच, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद वाढतो आणि सांघिक भावना अधिक दृढ होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या भाषणातून राजेंद्र पवार यांनी विदर्भातील नाट्य परंपरेचाही विशेष उल्लेख केला.
चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिश गजबे यांनी निर्मिती केलेल्या, श्रीपाद जोशी लिखित आणि संध्या चिवंडे दिग्दर्शित ‘रंग बावरी’ या नाटकाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तर, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक निर्मित, डॉ. चंद्रकांत शिंदे लिखित आणि नितीन नांदुरकर दिग्दर्शित ‘सिकॅरिअस’ या सस्पेन्स थ्रिलर नाटकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके निर्मित, प्रदीप फाटक लिखित आणि हेमराज ढोके दिग्दर्शित ‘ये रे घना’ आणि गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी निर्मित, अतुल साळवे लिखित व राजेंद्र गिरी दिग्दर्शित ‘दि ॲनॉनिमस’ या नाटकांनाही रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
‘Rang Bawari’ wins ‘Best of Show’ at MSEDCL’s Drama Competition; ‘Sicarius’ wins runner-up title
 
                                    


