चंद्रपूर :- ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला असून चंद्रपूर शहरात कमाल तापमान ३६.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत असून Heat Wave ‘ऑक्टोबर हिट’चा प्रभाव जिल्ह्यात जाणवू लागला आहे.
विदर्भातील अनेक शहरांच्या तापमानातही वाढ झाली आहे. ब्रह्मपुरी येथे ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात दुपारच्या वेळी उकाडा वाढला आहे. सकाळच्या तुलनेत दुपारनंतर उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्याने नागरिकांची दैनंदिन कामेही प्रभावित होत आहेत.
दरम्यान, विदर्भात अकोला येथे ३७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून ते राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान ठरले. अमरावती ३६.४, वर्धा ३६, बुलढाणा ३५.२, नागपूर ३५ आणि वाशिम ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
ऑक्टोबर सुरू होताच तापमानाचा पारा चढू लागल्याने नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, तसेच पुरेसे पाणी प्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
चंद्रपूरकरांना उन्हाचा चटका
दुपारच्या वेळी वाढलेली उष्णता आणि उकाड्यामुळे चंद्रपूरकर हैराण झाले आहेत. आगामी दिवसांत तापमानात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता असल्याने नागरिकांचे हवामानाच्या स्थितीकडे लक्ष लागले आहे.
