Provide government services to citizens on time and with pleasure – Public Service Rights Commissioner Abhay Yawalkar
वरोरा येथे तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा आणि शासकीय कार्यालयांची पाहणी
चंद्रपूर :- शासकीय नोकरीच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेची संधी आपल्याला मिळाली आहे. त्यासाठी शासन आपल्याला पगार देते. याची जाणीव ठेवून शासकीय कार्यालयात येणा-या सामान्य नागरिकांना वेळेत आणि आनंदाने सेवा द्यावी. नागरिकांसोबत आपली वागणूक सौजन्याची असायला पाहिजे, अशा सुचना राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर यांनी दिल्या.
वरोरा येथील नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी वरोरा उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक नयोमी साटम, नागपूर येथील राज्य लोकसेवा आयोगाचे उपसचिव सुनील कांबळे, वरोराचे तहसीलदार योगेश कौटकर, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन भोयर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. Provide government services to citizens on time and with pleasure – Public Service Rights Commissioner
नागरिकांना शासकीय सेवा देतांना आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा, असे सांगून आयुक्त श्री. यावलकर म्हणाले, अधिका-यांकडून नागरिकांना वेळेत आणि आनंदाने सेवा मिळाली, तर त्याच्या चेह-यावर झळकणारा आनंद काही वेगळाच असतो. त्यामुळे नागरिकांचे समाधान करा. रमाई, शबरी, प्रधानमंत्री आवास तसेच इतरही योजनांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. नागरिक आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळे दाखले वेळेत मिळाले पाहिजे. प्रमाणपत्र आणि दाखले वाटपासाठी तालुका स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करावे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे.
उपविभागीय अधिका-यांनी आपल्या विभागातील विविध शासकीय कार्यालयाच्या कामकाजाचा नियमितपणे आढावा घ्यावा. तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तसेच इतर विभागांनी शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. आपली वागणूक, आपले प्रेम नागरिक परत करीत असतात. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी काम करा.
पुढे ते म्हणाले, गटविकास अधिका-यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लोकसेवा हक्क कायद्याचे फलक लावावे. तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्या कार्यक्षेत्रात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किती आहेत, जे आहेत ते व्यवस्थित सुरू आहे की नाही, किंवा बंद असलेले पुन्हा सुरू करण्यासाठी नियोजन करावे. तालुक्यामध्ये आदर्श ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करावे. तसेच पंचायत समिती आणि नगर परिषदेमध्येसुध्दा सदर केंद्र महिला बचत गटांमार्फत चालविण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.
विविध शासकीय विभागांची पाहणी व नागरिकांच्या तक्रारींची दखल : यावेळी लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर यांनी वरोरा तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, भुमी अभिलेख कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद कार्यालयाची पाहणी केली. तसेच नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.