Postpone the training organized for newly appointed teachers – MLA Sudhakar Adbale
चंद्रपूर :- राज्यातील नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर सात दिवसांचे प्रशिक्षण ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आयोजित केले आहे. या कालावधीत दिवाळी सुट्ट्या व निवडणुक ड्युट्या असल्याने सदर प्रशिक्षण स्थगित करून विधानसभा निवडणुकीतनंतर घेण्याची मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले MLA Sudhakar Adbale यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पूणेचे संचालक यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील मुद्दा क्रमांक ५.१५ ते ५.२१ मध्ये शासकीय, खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था शाळांतील सर्व नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर सात दिवसांचे (५० तासांचे) प्रशिक्षण ०४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पूणेच्या वतीने आयोजित केले आहे.
सदर कालावधीमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे अनेक शिक्षक बाहेरगावी जात असतात. तसेच या कालावधीदरम्यान विधानसभेची निवडणूक आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी शिक्षकांच्या ड्युट्या सुद्धा लागलेल्या आहेत. अशावेळी सदर प्रशिक्षण योग्यरित्या होणे शक्य नाही. त्यामुळे हे प्रशिक्षण तात्पुरते स्थगित करून विधानसभा निवडणुकीनंतर घेण्यात यावे, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पूणेचे संचालक, प्रधान सचिव, आयुक्त (शिक्षण), संचालक (प्राथ./माध्य/उच्च माध्य.) यांच्याकडे केली आहे.