चंद्रपूर :- बल्लारपूर शहरातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ESIC रुग्णालय व आयुष रुग्णालयासाठी जमीन उपलब्ध होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत मौजा बल्लारपूर येथील बल्लारपूर इंडस्ट्रीज लि. (BGPPL) यांना निवासी प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आलेल्या शासकीय जमिनीपैकी १९.२३ हेक्टर जमीन १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत शासनजमा करण्याचा निर्णय आज मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. मा. अतिरिक्त मुख्य सचिव, महसूल विभाग श्री. विकासजी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
सदर जमीन शासनाने मंजूर केलेल्या मूळ उद्देशाव्यतिरिक्त औद्योगिक कारणासाठी वापरण्यात आल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतुदींचा भंग झाल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. या संदर्भातील आवश्यक प्रशासकीय व महसुली कार्यवाही तातडीने पूर्ण करून हा विषय सकारात्मकरीत्या निकाली काढण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तसेच शासन स्तरावर सातत्याने हा प्रश्न उपस्थित केला होता. BGPPLला निवासी प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आलेल्या जमिनीचा प्रत्यक्ष वापर, शासनाच्या अटी व शर्तींचे पालन आणि अटीभंग झाल्यास नियमानुसार जमीन शासनजमा करण्याबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला आता ठोस प्रशासकीय निर्णयाच्या माध्यमातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
बल्लारपूर शहरातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील विकासाच्या गरजा लक्षात घेता सार्वजनिक प्रकल्पांसाठी उपलब्ध शासकीय जमीन अत्यंत मर्यादित आहे. सार्वजनिक सुविधांसाठी जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या शासकीय जमिनीचा योग्य, नियोजनबद्ध आणि लोकहितासाठी प्रभावी वापर होणे आवश्यक असल्याची भूमिका आ. मुनगंटीवार यांनी मांडली.
ESIC व आयुष रुग्णालयांसाठी जमीन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा
बल्लारपूर येथे राज्य कामगार विमा योजना (ESIC) रुग्णालय आणि आयुष रुग्णालय उभारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली होती. या आरोग्य सुविधांचा लाभ कामगार, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर १९.२३ हेक्टर जमीन १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत शासनजमा करण्याचा निर्णय झाल्याने ESIC रुग्णालय व आयुष रुग्णालय या महत्त्वपूर्ण सार्वजनिक आरोग्य प्रकल्पांसाठी आवश्यक जमीन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे बल्लारपूर शहरातील नागरिकांना भविष्यात अधिक सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
लोकहिताच्या वापरासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना
शासनजमा होणाऱ्या १९.२३ हेक्टर जमिनीचा नियोजनबद्ध, प्रभावी आणि लोकहिताला पूरक वापर कसा करता येईल, यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचना मा. अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) श्री. विकासजी खारगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
सार्वजनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी या जमिनीचा उपयोग व्हावा, यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. उपलब्ध होणाऱ्या जमिनीचा नागरिकांच्या दीर्घकालीन गरजा आणि बल्लारपूरच्या भविष्यातील विकासाचा विचार करून उपयोग करण्याची भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली.
महसूल विभागाची सकारात्मक भूमिका
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तसेच शासन स्तरावर सातत्याने हा प्रश्न उपस्थित करून BGPPLला मंजूर करण्यात आलेल्या जमिनीच्या वापराबाबत वस्तुस्थिती तपासून अटीभंग झाल्यास जमीन शासनजमा करण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत महसूल विभागाने याबाबत तातडीने कार्यवाही पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.बल्लारपूर शहराच्या विकासासाठी उपलब्ध होणाऱ्या शासकीय जमिनीचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करून नागरिकांना आवश्यक सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे, स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि बल्लारपूरच्या औद्योगिक व सर्वांगीण विकासाला गती देणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.
या बैठकीस संबंधित महसूल अधिकारी तसेच चंद्रपूर जिल्हाधिकारी श्रीमती वसुमना पंत या दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या.
