Overwhelming response to the National SC-ST Hub’s entrepreneur awareness program in Chandrapur
चंद्रपूर :- भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय एससी-एसटी हब (NSSH) आणि बौद्ध उद्योजक वाणिज्य व उद्योग संघटना (BEACI) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजक जागरूकता व विशेष विक्रेता विकास कार्यक्रमाला (EA&SVDP) चंद्रपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात सुमारे ११० नवोदित व विद्यमान उद्योजकांनी सहभाग घेतला. एससी/एसटी उद्योजकांना शासकीय खरेदी प्रक्रिया, विविध शासकीय योजना आणि उद्योगविकासाच्या संधींबाबत मार्गदर्शन करून त्यांना सक्षम बनविणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. National SC-ST Hub’s entrepreneur awareness program in Chandrapur
कार्यक्रमाच्या प्रारंभी बीईएसीआयचे संस्थापक अध्यक्ष रत्नदीप कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून उद्योजकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत उद्योग क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन केले. नवकल्पना, उद्योजकता आणि सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून सक्षम व शाश्वत उद्योग उभारण्यावर त्यांनी भर दिला.
राष्ट्रीय एससी-एसटी हब, पुणेचे प्रभारी रितेश रंगारी यांनी केंद्र सरकारच्या सार्वजनिक खरेदी धोरणाची सविस्तर माहिती देताना केंद्रीय मंत्रालये, विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी त्यांच्या वार्षिक खरेदीपैकी किमान चार टक्के खरेदी एससी/एसटी मालकीच्या सूक्ष्म व लघु उद्योगांकडून करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. तसेच उद्योजकांनी उद्यम नोंदणी, गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) वर नोंदणी करून शासकीय निविदांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
एमएसएमई-डीएफओ, नागपूरच्या उपसंचालक सौ. परिनीता पांढरम यांनी एमएसएमई क्षेत्रासाठी उपलब्ध विविध विकास योजना आणि संधींची माहिती दिली. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) चे एस. टी. उके तसेच वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) चे राजेंद्र पटेल यांनी त्यांच्या संस्थांतील खरेदी प्रक्रिया, विक्रेता नोंदणी आणि एससी/एसटी उद्योजकांसाठी उपलब्ध व्यावसायिक संधींबाबत मार्गदर्शन केले.
GeM फॅसिलिटेटर अंकुश माकडे यांनी GeM नोंदणी, कॅटलॉग व्यवस्थापन व शासकीय निविदांमध्ये सहभाग याविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक रोहित नंदनवार यांनी एमएसएमई कर्ज योजना व वित्तपुरवठ्याची माहिती दिली. सीए भूपेंद्र कोचर यांनी आर्थिक साक्षरता, कर प्रणाली आणि वैधानिक अनुपालन यावर मार्गदर्शन केले. जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूरचे प्रतिनिधी श्री. कमटी यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजित प्रश्नोत्तर सत्रात उद्योजकांच्या शासकीय खरेदी, वित्तपुरवठा, नोंदणी प्रक्रिया आणि उद्योग विकासाशी संबंधित विविध प्रश्नांचे समाधान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बीई धम्मदीप रामटेके, बीई समीर रामटेके, सुमित मेश्राम, बीई प्रवीण वाल्के तसेच संपूर्ण BEACI टीमने विशेष परिश्रम घेतले.
एससी/एसटी उद्योजकांना शासकीय खरेदीच्या मुख्य प्रवाहाशी जोडून त्यांची स्पर्धात्मक क्षमता वाढविण्यास आणि सर्वसमावेशक उद्योजकतेला चालना देण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.