Outcome of the Half-Hour Discussion in the Legislative Assembly: Environment Minister Pankaja Munde Inspects the Zharpat River
चंद्रपूर :- विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार MLA Sudhir Mungantiwar यांनी मांडलेल्या अर्धा तास चर्चेला राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत पर्यावरण तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषणाचा व्यापक पाहणी दौरा केला. या दौऱ्यामुळे चंद्रपूर शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नाला पुन्हा एकदा राज्याच्या पातळीवर गांभीर्याने हाताळले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. Zharpat and Irai Rivers to be Revitalized
दौऱ्यादरम्यान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी चंद्रपूर शहरातील झरपट नदीची प्रत्यक्ष पाहणी करून नदीतील प्रदूषणाची तीव्रता, साचलेला कचरा, औद्योगिक व सांडपाण्याचा प्रवाह याचा सखोल आढावा घेतला. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी तातडीच्या उपाययोजना राबविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
उल्लेखनीय म्हणजे, दिनांक २४ मार्च २०२६ रोजी विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नद्यांच्या प्रदूषणाचा गंभीर मुद्दा उपस्थित करत झरपट व इरई या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली होती. या चर्चेनंतरच शासनाने या विषयाकडे प्राधान्याने लक्ष देत आजचा पाहणी दौरा निश्चित केला. Environment Minister Pankaja Munde Inspects the Zharpat River
यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की, राज्यात लवकरच “नदी पुनर्जीवन प्राधिकरण” स्थापन करण्यात येणार असून, त्याच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील झरपट व इरई या दोन्ही नद्यांचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी दीर्घकालीन, शाश्वत व परिणामकारक उपाययोजना राबविण्यास गती मिळणार आहे.
दौऱ्यादरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी झरपट नदीचे धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करत केवळ तात्पुरत्या नव्हे तर दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देत प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर निर्णय घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मनपा आयुक्त, महापौर संगीता खांडेकर, नगरसेवक सर्वश्री राहुल पावडे, प्रज्वलंत कडू, नंदू नागरकर, वसंत देशमुख, सुरज पेदुलवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर पर्यावरण तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी चंद्रपूर येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयाला भेट देत तेथील सुविधा, मनुष्यबळ व उपलब्ध सेवांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांना अधिक दर्जेदार व तत्पर सेवा मिळाव्यात यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सुरेश कुंभरे यांनी त्यांचे स्वागत केले.
या भेटीदरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
एकूणच, विधानसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्याचा पाठपुरावा करत चंद्रपूर मधील प्रदूषणाच्या प्रश्नावर शासनाने थेट मैदानात उतरून कारवाईची दिशा निश्चित केल्याने नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.
झरपट व इरई नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेला या दौऱ्यामुळे निश्चितच नवी चालना मिळणार आहे.