Large Cache of MD Drugs Seized in Chandrapur
चंद्रपूर : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) LCB मोठी कारवाई करत 101 ग्रॅम एमडी (MD) ड्रग्ज पावडरसह एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 5 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. MD Drugs Seized in Chandrapur
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मोहिमे दरम्यान पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पथक गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. नागपूर येथून एक इसम मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी चंद्रपुरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वरोरा पोलीस स्टेशन हद्दीतील खंबाळा शिवारात सापळा रचला.
दरम्यान, संशयित मोपेड वाहनावरून आलेल्या युवकाची झडती घेतली असता त्याच्याकडून 101 ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर आढळून आली. पोलिसांनी आरोपी अमित कृष्णा गजभिये (वय 22, रा. इंदोरा, नागपूर) याला तात्काळ ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने नागपूर व चंद्रपूर येथील साथीदारांच्या मदतीने ड्रग्ज विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.
या प्रकरणात हर्षल टेम्बेकर (रा. इंदोरा, नागपूर) व सोहेल शेख उर्फ सोहेल एसके (रा. चंद्रपूर) यांचा सहभाग समोर आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
कारवाई दरम्यान पोलिसांनी 5 लाख रुपये किंमतीची एमडी ड्रग्ज पावडर, 10 हजार रुपयांचा 1 मोबाईल फोन आणि 80 हजार रुपयांची मोपेड असा एकूण 5 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर आरोपीविरुद्ध वरोरा पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्यान्वये कलम 8(क), 22(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोहवा सुभाष गोहोकर, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार (चंद्रपूर एलसीबी) व पोहवा कार्तिक खनके, अनिमेश भोंगळे वरोरा पोलीस स्टेशन पथक तथा सायबर पोलिसांनी पार पाडली.