Tuesday, July 21, 2026
HomeHealthबल्लारपूर विधानसभेची आरोग्य सेवा ठरावी महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल

बल्लारपूर विधानसभेची आरोग्य सेवा ठरावी महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल

चंद्रपूर :- बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था राज्यासाठी आदर्श ठरावी, या उद्देशाने सन 2029 पर्यंतचा सर्वसमावेशक आरोग्य विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. चंद्रपूर येथील नियोजन भवन सभागृहात आ. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या बैठकीत आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौशल्यवर्धन, डिजिटल आरोग्य व्यवस्थापन,लोकाभिमुख आरोग्य सेवा उभारणीबाबत महत्त्वपूर्ण दिशा निश्चित करण्यात आली.

बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, तहसीलदार मोहनिष शेलवटकर, तहसीलदार विजय पवार, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, गटविकास अधिकारी नमिता बांगर, संगीता भांगरे, किशोर शिंदे, पोंभूर्णा नगराध्यक्ष सुलभाताई पिपरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बावणे, डॉ. वंदना खंडाळकर, डॉ. अमित जयस्वाल, डॉ. आशा साळवे, डॉ. दीपक केदारपवार तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील आरोग्य विषयक उपक्रम अधिक प्रभावी व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने 3 जानेवारी 2022 रोजी शासनाने कामकाज आढावा समितीची स्थापना केली. त्यानंतर 30 डिसेंबर 2025 रोजी सनियंत्रण व सल्लागार समिती आणि 14 मे 2026 रोजी एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची स्थापना करण्यात आली.केवळ समिती स्थापन करून थांबायचे नाही, तर तिची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध, अभ्यासपूर्ण आणि परिणामकारक काम करणे आवश्यक आहे. पुढील तीन वर्षांत महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट समिती म्हणून बल्लारपूरची ओळख निर्माण झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

समितीच्या कामकाजाचा नियमित आढावा घेण्यासाठी पुढील बैठक 13 ऑगस्ट 2026 रोजी नियोजन भवन येथे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीस जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, समित्यांचे प्रमुख, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी तसेच आरोग्य क्षेत्रातील युवक-युवतींना निमंत्रित करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.

ऑगस्टअखेर होणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे सादरीकरण राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी आदर्श ठरेल, इतके दर्जेदार, आकर्षक आणि माहितीपूर्ण असावे, असे सांगून आ. मुनगंटीवार यांनी प्रत्येक आकडेवारी अद्ययावत, विश्लेषणात्मक व पुराव्यासह सादर करण्याचे निर्देश दिले.

बैठकीत सन 2029 पर्यंतचा आरोग्य विकास आराखडा तयार करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांतील भौतिक सुविधा, निर्लेखित इमारती, आवश्यक बांधकामे, डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, औषध व्यवस्थापन, रुग्णालयातील स्वच्छता, सूचना फलक, सेवा माहिती, असंसर्गजन्य आजारांसाठी विशेष कृती आराखडा, सोनोग्राफी, ईसीजी, एमआरआयसारख्या वैद्यकीय उपकरणांचे नियोजन, आरोग्य केंद्रांचे ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाशी समन्वय, प्रत्येक आरोग्य केंद्रात नियमित समिती बैठका आणि इतिवृत्त, तक्रार निवारण यंत्रणा, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी गणवेश व नेमप्लेट, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेत देणे, आरोग्य क्षेत्रातील मॅपिंग, स्थानिक युवक-युवतींना आरोग्य क्षेत्रासाठी प्रशिक्षण तसेच डिजिटल आरोग्य व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले.

आरोग्य क्षेत्रासाठी आवश्यक निधी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांतून, जिल्हा नियोजन, सीएसआर, खनिज विकास निधी, आयुष मंत्रालय तसेच इतर उपलब्ध स्रोतांमधून उपलब्ध करून घेण्याबाबत सविस्तर माहिती संकलित करण्याचे निर्देशही आ. मुनगंटीवार यांनी दिले. यावेळी त्यांनी मंत्री असताना खनिज विकास निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून 32 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे स्मार्ट पीएचसीमध्ये रूपांतर करण्यात आले असल्याची आठवण करून दिली.

निरोगी नागरिक हेच सक्षम राष्ट्राचे खरे सामर्थ्य आहे. शरीर आणि मन दोन्ही सुदृढ असेल तरच देश विकासाच्या शिखरावर पोहोचू शकतो.लोकाभिमुख, गतिमान आणि भौतिकदृष्ट्या सक्षम आरोग्य व्यवस्था उभारणे हेच एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीचे ध्येय असून, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ राज्यातील आदर्श आरोग्य मॉडेल म्हणून विकसित करण्यासाठी प्रत्येकाने समर्पित भावनेने काम करावे,” असे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular