चंद्रपूर :- शहरातील बाबूपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्धपुतळ्याच्या मागे असलेल्या बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवनाची तात्काळ स्वच्छता, रंगरंगोटी, दुरुस्ती व नियमित देखभाल करण्यात यावी, तसेच हे भवन सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि नागरिकांच्या वैयक्तिक कार्यक्रमांसाठी नाममात्र शुल्कात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी बहुजन समाज पार्टी, चंद्रपूरच्या वतीने चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
बाबूपेठ परिसरातील बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे भवन सध्या अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत असून स्वच्छता व देखभाल अभावी ते वापरासाठी अयोग्य बनले आहे. त्यामुळे नागरिकांना या सार्वजनिक वास्तूचा लाभ घेता येत नसल्याने जनहिताच्या दृष्टीने तातडीने स्वच्छता, दुरुस्ती आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून भवन नियमित वापरासाठी खुले करावे, अशी मागणी नगरसेविका सोनिया उंदीरवाडे यांच्या नेतृत्वात बहुजन समाज पक्षाच्या वतीने महानगर पालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी बहुजन समाज पार्टीच्या प्रभाग क्र. १३ च्या नगरसेविका सोनिया उंदीरवाडे यांच्यासह मनोहर साखरे, किशोर चिकाटे, विमित कोसे, प्रशांत उंदीरवाडे, दादाजी धाकडे आदी बहुजन समाज पार्टी, चंद्रपूरचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.