case will be registered if electricity is left flowing in the fence
चंद्रपूर :- वन्य प्राण्यांपासून होणारी पिकाची नासाडी रोखण्यासाठी काही शेतकरी कुंपणात वीज प्रवाह सोडत असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले आहे. परंतु त्यामुळे वन्य प्राण्यांबरोबरच शेतात कामांसाठी गेलेल्या आणि अनावधानाने कुंपणास स्पर्श करणा-या शेतकऱ्यांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू होत असल्याची बाब समोर आली आहे. शिवाय यासाठी वीजही आकडे टाकून चोरून वापरत असल्याचे दिसून आले आहे. याची महावितरणने गंभीर दखल घेतली असून यापुढे कुंपणात अनधिकृत वीज प्रवाह सोडलेला आढळल्यास संबंधितावर विद्युत कायद्याच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. Mahavitaran (Msedcl) takes serious note
मागिल काही महिन्यांपासून विजेचा शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडत आहे. याची अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता महावितरणच्या असे लक्षात आले की, शेतकरी पिकाच्या संरक्षणासाठी वीज वाहिन्यांवर आकोडे टाकून वीज प्रवाह थेट कुंपणात सोडतात. त्यामुळे अनावधानाने संपर्कात आलेल्या प्राण्यांसोबत शेतक-यांचेही मृत्यू झाल्याच्या काही घट्ना उघडकीस आल्या आहेत. एकंदरीत हा प्रकार वाटतो तितका साधा नसून वीजचोरी बरोबरच सदोष मनुष्यवध यांसारख्या गंभीर गुन्ह्यांशी संबंधित आहे. तसेच जीवितहानी झाल्यानंतर त्याचा दोष विनाकारण महावितरणवर थोपण्याचा आणि महावितरण कडून भरपाई मागण्याचा कल देखील दिसून येत आहे.
महावितरणने घेतली गंभीर दखल
वीज वाहिन्यांवर अनधिकृतपणे आकोडे टाकून कुंपणात थेट वीज प्रवाह सोडण्याच्या या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी महावितरणने कायदेशीर कारवाई करण्याचे ठरविले आहे. यासाठी, तांत्रिक कर्मचारी तसेच भरारी पथकाच्या माध्यमातून शेतशिवारात गस्त घालण्यात येणार आहे. त्यावेळी हा प्रकार आढळला तर संबंधित शेतक-यावर विद्युत कायदा 2003 च्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तसेच संभाव्य जीवितहानीची शक्यता लक्षात घेऊन संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती पोलिस विभागाला करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे. Msedcl
आकोडे टाकून वीज चोरी करून शेताच्या कुंपणामध्ये वीज प्रवाह सोडणा-या शेतक-याला यापुढे गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असून संभाव्य जीवित हानीची शक्यता लक्षात घेता याबाबत फौजदारी गुन्हाही नोंदविला जाऊ शकतो याची दखल घेत शेतकऱ्यांनी स्वतः या प्रकारामध्ये सहभागी होऊ नये आणि कोणी सहभागी होत असल्यास त्याला तसे करण्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन देखील महावितरणने केले आहे.