Saturday, September 26, 2026
HomeGrampanchayat‘स्वच्छ सेवा आकलन’ अंतर्गत ग्रामपंचायतींनी स्वयं-मूल्यांकन वेळेत पूर्ण करावे

‘स्वच्छ सेवा आकलन’ अंतर्गत ग्रामपंचायतींनी स्वयं-मूल्यांकन वेळेत पूर्ण करावे

चंद्रपूर :- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-II अंतर्गत ‘स्वच्छ सेवा आकलन’ उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील ओडीएफ प्लस (मॉडेल) ग्रामपंचायतींच्या स्वच्छता व्यवस्थेचे वार्षिक डिजिटल स्वयं-मूल्यांकन करण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी निर्धारित कालमर्यादेत स्वयं-मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील स्वच्छता सेवांची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सातत्यपूर्ण सुधारणा यांना बळकटी देणे हा ‘स्वच्छ सेवा आकलन’ उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या अंतर्गत ओडीएफ स्थितीची शाश्वतता, घन व द्रवकचरा व्यवस्थापन, गावातील दृश्य स्वच्छता, घन व द्रवकचरा व्यवस्थापन साधनांचे कार्यान्वयन व देखभाल तसेच सामुदायिक स्वच्छता संकुलांचे कार्यान्वयन व देखभाल आदी बाबींचे मूल्यांकन केले जाणार आहे. Digital self-assessment to be conducted on the e-GramSwaraj portal

हे मूल्यांकन ग्रामपाणी व स्वच्छता समिती तसेच स्थानिक समुदायाच्या सहभागातून प्रमाणित प्रश्नावलीच्या आधारे करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील स्वच्छता व्यवस्थेची सद्यस्थिती स्पष्ट होण्यासोबतच आवश्यक सुधारणा निश्चित करणे शक्य होणार आहे.

ई – ग्रामस्वराज पोर्टलवर भरावी माहिती
स्वच्छ सेवा आकलन प्रक्रियेत ग्रामपंचायत सचिवांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या लॉगीन मधून ई – ग्रामस्वराज पोर्टलवर संबंधित ओडीएफ प्लस (मॉडेल) ग्रामपंचायतीची प्रारूप माहिती भरावी. ही माहिती ग्रामसभेसमोर चर्चा व पडताळणीसाठी सादर करून आवश्यक ठरावाद्वारे मान्यता घ्यावी. ग्रामसभेच्या मान्यतेनंतर निदर्शनास आलेल्या त्रुटींची पूर्तता करून आवश्यक सुधारणा कराव्यात व अंतिम माहिती पोर्टलवर सादर करावी.

2 ऑक्टोबरला विशेष ग्रामसभा
स्वच्छ सेवा आकलनाच्या तिसऱ्या टप्प्यात 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ग्रामपंचायतींचे स्वयं-मूल्यांकन करण्यात येत आहे. त्यानुसार प्रारूप स्वयं-मूल्यांकन अहवाल तयार करून 2 ऑक्टोबर 2026 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करावी व ग्रामसभेत अहवालावर सविस्तर चर्चा करून त्याची पडताळणी करावी. त्यानंतर आवश्यक सुधारणा करून अंतिम माहिती सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील ओडीएफ प्लस (मॉडेल) ग्रामपंचायतींनी 25 सप्टेंबरपर्यंत स्वयं-मूल्यांकनास सुरुवात करणे, 2 ऑक्टोबर रोजी विशेष ग्रामसभा घेणे, 26 ऑक्टोबरपर्यंत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करणे आणि 30 ऑक्टोबरपर्यंत ई ग्रामस्वराज पोर्टलवरील माहिती सुधारित करून अंतिम करणे, अशी कालबद्ध कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे.

‘स्वच्छ सेवा आकलन’मधून प्राप्त होणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे ग्रामपंचायत स्तरावरील स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी व कमतरता ओळखून त्यावर कालबद्ध सुधारणा आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच या निष्कर्षांचा पुढील ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना नियोजनासाठी उपयोग केला जाणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन स्वच्छता व्यवस्थेबाबत वस्तुनिष्ठ माहिती नोंदवावी, आढळलेल्या त्रुटींची वेळेत पूर्तता करावी आणि निर्धारित कालमर्यादेत स्वयं-मूल्यांकनाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग आणि जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मच्छिंद्रनाथ धस यांनी केले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular