चंद्रपूर :- सोशल मीडियाच्या युगातील Gen-Z युवकांपर्यंत त्यांच्याच भाषेत आणि त्यांच्या शैलीत कायदा-सुव्यवस्थेचा संदेश पोहोचविण्याचा अनोखा प्रयत्न गणेश विसर्जन मिरवणुकीत करण्यात आला. ‘बदमाशी’चा दिखावा करणाऱ्या सोशल मीडिया स्टोरीला लक्ष्य करत युवकांनी हातात घेतलेल्या फलकावरील संदेशाने मिरवणुकीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. Ganesh Visarjan Rally
‘बदमाशी वाली स्टोरी लगाने से कोई बदमाश नहीं बनता लाला… धरती छोटी पड़ जाती है जब पुलिस पीछे पड़ जाती है!’ असा मजकूर असलेला फलक घेऊन युवक रॅलीत सहभागी झाला. पारंपरिक जनजागृतीच्या भाषेपेक्षा Gen-Z युवक ज्या सोशल मीडिया भाषेशी सहज जोडले जातात, त्याच भाषेत त्यांना समजावून सांगण्याचा हा प्रयत्न ठरला. Chandrapur Police
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर एखादी ‘स्टोरी’ किंवा पोस्ट टाकून स्वतःची ‘दादागिरी’ दाखविण्याचा प्रयत्न काही युवकांकडून केला जातो. मात्र, सोशल मीडियावरील दिखावा आणि प्रत्यक्ष आयुष्यातील कायदा यामध्ये मोठा फरक आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही आणि चुकीच्या कृत्याचे परिणाम भोगावेच लागतात, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या रॅलीमधील फलकाचा उद्देश युवकांमध्ये पोलिसांची भीती निर्माण करणे नसून कायद्याचा आदर आणि चुकीच्या मार्गापासून दूर राहण्याची जाणीव निर्माण करणे, हा होता. युवकांपर्यंत त्यांच्याच भाषेत संदेश पोहोचल्यास तो अधिक प्रभावीपणे समजतो, याची प्रचिती या उपक्रमातून आली.
दरम्यान, रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी या उपक्रमाला प्रोत्साहन देत काही काळ रॅलीसोबत सहभाग घेतला. पोलिस अधिकाऱ्यांनी युवकांच्या या सकारात्मक उपक्रमाला दिलेली साथ उपस्थितांसाठीही कौतुकाचा विषय ठरली.
गणेश विसर्जनाच्या उत्साहात ‘एन्जॉय करा, पण कायद्याच्या चौकटीत; सोशल मीडियावर स्टाईल करा, पण आयुष्याची दिशा बिघडवू नका’, असा संदेश देणारी ही रॅली युवकांसाठी वेगळ्या पद्धतीची जनजागृती ठरली.
