चंद्रपूर :- आगामी मस्कऱ्या गणपती स्थापना व विसर्जन, नवरात्रोत्सव, दांडिया, दसरा तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासनाने ध्वनी व प्रकाशयंत्रणांच्या वापराबाबत कडक निर्बंध लागू केले आहेत. लेझर लाईट, तीव्र फ्लॅश लाईट, डीजे, प्लाझ्मा सिस्टीम, मॉडिफाइड साउंड सिस्टीम, वूफर व सबवूफर यांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३६ व ३८(१) अन्वये विशेष मनाई आदेश जारी केला आहे. Chandrapur police restricts laser lights, DJs and loud speakers ahead of festivals
हा आदेश २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपासून ३० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
आगामी काळात विविध धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार असल्याने सार्वजनिक शांतता, कायदा-सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
लेझर लाईटवर पूर्ण बंदी
मिरवणुकीदरम्यान मानवी डोळ्यांवर अथवा आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या लेझर लाईट, अतितीव्र फ्लॅश लाईट व अन्य धोकादायक प्रकाशयंत्रणांचा वापर पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आला आहे. मिरवणुकीतील प्रकाशयंत्रणांची पोलीस अधिकारी किंवा सक्षम प्राधिकारी तपासणी करू शकतील. धोकादायक उपकरण आढळल्यास ते तत्काळ बंद करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत.
डीजे व मॉडिफाइड साउंड सिस्टीमला मनाई
सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक, लाऊडस्पीकर व अॅम्प्लीफायर वापरण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्व लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. अत्यंत तीव्र व हानीकारक ध्वनी निर्माण करणाऱ्या डीजे, प्लाझ्मा सिस्टीम, मॉडिफाइड साउंड इक्विपमेंट, वूफर व सबवूफर यांच्या वापरास मनाई करण्यात आली आहे.
रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक बंद
रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व डीजे वापरण्यास सक्त मनाई राहणार आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी विशेष सवलत दिलेले दिवस व वेळ याला अपवाद राहणार आहेत. रुग्णालये, शैक्षणिक संस्था व न्यायालये आदी घोषित शांतता क्षेत्रांमध्ये ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
क्षेत्रानुसार डेसिबलची मर्यादा
औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ व रात्री ७० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ व रात्री ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रात दिवसा ५५ व रात्री ४५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात दिवसा ५० व रात्री ४० डेसिबलपर्यंत ध्वनी मर्यादा राहणार आहे.
उल्लंघन झाल्यास उपकरणे जप्त
पोलिस प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास ध्वनी व प्रकाशयंत्रणा तसेच संबंधित उपकरणे जप्त केली जाऊ शकतात. आयोजक, ऑपरेटर अथवा वाहनचालकांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक, उत्सव मंडळे, आयोजक व संबंधितांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. ध्वनी व प्रकाश प्रदूषण टाळून शांततापूर्ण वातावरणात सण-उत्सव साजरे करावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर पोलिस प्रशासनाने केले आहे.
