चंद्रपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक व सुरक्षित विसर्जन सुनिश्चित करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांना विसर्जनासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देतानाच जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. Chandrapur Municipal Corporation ready for Ganesh Visarjan
गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी रामसेतू पुलाखाली कृत्रिम विसर्जन तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. याठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार असून, नदीपात्रातील थेट विसर्जन टाळून पर्यावरणाचे संरक्षण करण्यावर महानगरपालिकेचा भर आहे.
ईमानदार मतदाता.. बेईमान चुनाव आयोग के कटघरे मे…….
या विसर्जनस्थळाची पाहणी महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश, उपयुक्त संदीप चिद्रावार यांनी केली. तसेच मुख्य अभियंता रवींद्र हजारे, स्वच्छता अधिकारी डॉक्टर अमोल शेळके, रवींद्र कळंबे, चैतन्य चोरे, प्रगती भुरे, सोनू थूल, अहमद सिद्दीक इ. उपस्थित मनपा अधिकारी यांनी यावेळी विसर्जनस्थळी करण्यात आलेल्या विविध व्यवस्थांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, मूर्ती विसर्जनाची प्रक्रिया, प्रकाशयोजना तसेच आवश्यक मनुष्यबळ याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली असून, क्रेनच्या सहाय्याने मूर्ती कृत्रिम तलावात सुरक्षितपणे विसर्जित करण्यात येणार आहेत. विसर्जन प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी पुरेशी प्रकाशयोजना करण्यात आली आहे.
गणेश विसर्जनाच्या कालावधीत नागरिकांची मोठी गर्दी लक्षात घेता, विसर्जनस्थळी सुरक्षितता व शिस्त राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना विसर्जनाच्या वेळी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेला बळ देत, सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रदूषणमुक्त गणेश विसर्जनासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे यावेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
