Saturday, April 26, 2025
HomeMLAसण, उत्सव आनंदाने आणि शांततेत साजरे करा

सण, उत्सव आनंदाने आणि शांततेत साजरे करा

Celebrate the festival with joy and peace

चंद्रपूर :- आगामी काळात जिल्ह्यात पोळा, गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद असे सर्वधर्मीय सण मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. चंद्रपूर हा जिल्हा शांततेसाठी प्रसिध्द आहे. जिल्ह्याचा हाच लौकिक कायम राखण्यासाठी तसेच सर्वधर्मीय सण शांततेत आणि उत्साहात साजरे होण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. Celebrate the festival with joy and peace

नियोजन सभागृह येथे पोलिस दलातर्फे आयोजित जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, सहायक पोलिस अधिक्षक नियोमी साटम, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, डॉ. मंगेश गुलवाडे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, पोलिस पाटील तसेच शांतता समितीचे सदस्य आणि गणेश मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सण आणि उत्सवासंदर्भात प्रशासनाकडून देण्यात येणा-या सुचनांचे सर्वांनी गांभिर्याने पालन करणे गरजेचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, शहरात तसेच तालुका स्तरावर महसूल, नगर पालिका प्रशासन आाणि पोलिस विभागाच्या अधिका-यांनी मिरवणुकीचा मार्ग, विसर्जन स्थळ आदींना त्वरीत भेट देऊन पाहणी करावी. गणेश मंडळांनी प्रत्येक दिवशी प्रत्येक शिफ्टकरीता किमान एक स्वयंसेवक, मुर्ती आणि मंडपाच्या संरक्षणासाठी नेमावा. सर्व गणेश मंडळांनी सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. प्रत्येक मंडळाने मंडप उभारतांना वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अग्निशमन, रुग्णवाहिका तसेच दुचाकी-चारचाकी वाहने सुरळीत वाहतूक करू शकतील, याची दक्षता घ्यावी. लेजर लाईटवर बंदी आहे, त्यामुळे कुणीही त्याचा वापर करू नये. डीजे चा आवाज मर्यादेतच ठेवावा. राष्ट्रगीत आणि राज्यगीताचा एक ठराविक प्रोटोकॉल आहे, त्यामुळे डीजेवर राष्ट्रगीत व राज्यगीत वाजवू नये. तसेच मंडळांनी फायर ऑडीट करून घ्यावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्याचा शांततेचा लौकिक कायम ठेवा : आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar 
चंद्रपूर जिल्हा हा राज्यात शांततेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सर्वधर्मीय सण येथे अतिशय आनंदाने आणि शांततेत पार पाडण्याचा सर्वांचाच प्रयत्न असतो. शांततेची हीच ओळख कायम ठेवावी, अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या. पुढे ते म्हणाले, शांतता समितीच्या सदस्यांकडून आलेल्या सुचनांची प्रशासनाने नोंद घेतली आहे. सर्व मंडळांनी विसर्जनाच्या मिरवणुका वेळेत काढाव्यात. श्रींच्या मुर्तीकडे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी मंडळांनी दक्षता घ्यावी. प्रशासनाच्या सुचनांचे सर्वांनी पालन करावे व हा उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडावा, असे आवाहनही त्यांनी केले.

चांदा क्लब ग्राऊंडवरच मूर्ती आणि पुजेचे साहित्य मिळणार : मूर्ती आणि पुजेचे साहित्य खरेदीकरीता रस्त्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी चांदा क्लब ग्राऊंड हे मूर्तीकरीता आणि पुजेच्या साहित्याकरीता उपलब्ध करून देण्यात आले आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. शहरातील 100 टक्के गणेश मुर्तीचे विसर्जन हे महानगर पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रीम कुंडामध्येच करावे. तसेच विविध परवानगीसाठी मनपाच्या वतीने ‘एक खिडकी’ योजना सुरू करण्यात आली आहे, गणेश मंडळांनी त्वरीत त्यासाठी अर्ज दाखल करावे, असे आवाहन महानगर पालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले.

मिरवणूका विनाकारण रस्त्यावर थांबवू नये – अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधू

सर्व गणेश मंडळांनी दिलेल्या वेळेतच विसर्जनाची मिरवणूक काढावी. कोणत्याही धार्मिक स्थळासमोर किंवा रस्त्यावर विनाकारण मिरवणूक थांबवू नये, त्या सतत पुढे नेऊन रस्ता मोकळा करावा. जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच प्रशासनाच्या एका ठेक्याला सर्व साऊंड सिस्टीम बंद करावी. पोलिस आपल्या मदतीला आहेच, काही अघटीत घडण्याची माहिती असल्यास त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांनी केले.

नागरिकांच्या सुचना : यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी विविध सुचना केल्या. यात सायबर सेलच्या माध्यमातून अफवांवर नियंत्रण ठेवावे. नागरिकांनीही अफवांवर विश्वास ठेवू नये, रस्त्यावरचे गड्डे त्वरीत बुजवावे, शांतता समितीची बैठक तीन महिन्यातून एकदा घ्यावी, गणेश मंडळांना मंडपसाठी सिमांकन करून द्यावे, विसर्जन स्थळी सर्व सुविधा उपलब्ध असाव्यात, डीजे चा आवाज मर्यादेत असावा, सर्व सीसीटीव्ही कॅमेरे त्वरीत सुरू करावे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, डॉक्टरांचे पथक तयार ठेवावे आदींचा यात समावेश होता.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular