चंद्रपूर :- वाढदिवस म्हटला की पार्ट्या, आतषबाजी आणि अनावश्यक खर्चाचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. मात्र, या परंपरेला फाटा देत व्हॉईस ऑफ मीडियाचे चिमूर तालुका सचिव शुभम बारसागडे आणि सदस्य प्रवीण वाघे यांनी समाजातील उपेक्षित व निराधार बांधवांसोबत वाढदिवस साजरा करून सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दिला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. Shubham and Pravin celebrated their birthdays with the destitute
आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुभम बारसागडे आणि प्रवीण वाघे यांनी चिमूर तालुक्यातील जामगाव येथील दिव्यवंदना फाऊंडेशनमध्ये वास्तव्यास असलेल्या मनोरुग्ण व निराधार बांधवांना नवीन कपडे आणि ताज्या फळांचे वाटप केले. यावेळी त्यांनी या बांधवांसोबत केक कापून वाढदिवसाचा आनंद साजरा केला. समाजातील दुर्लक्षित घटकांनाही आनंदाच्या क्षणांत सहभागी करून घेण्याच्या त्यांच्या या कृतीने माणुसकीचे दर्शन घडविले. Distribution of new clothes and fruits to the mentally ill and the destitute
उपेक्षितांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य
रस्ते, बसस्थानके आणि रेल्वेस्थानक परिसरात अनेक निराधार व्यक्ती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगताना दिसतात. मानसिक अडचणींमुळे किंवा इतर कारणांमुळे समाजापासून दूर गेलेल्या अशा व्यक्तींना आधार देण्याचे काम जामगाव येथील दिव्यवंदना फाऊंडेशनच्या माध्यमातून केले जाते. या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.
याच सामाजिक कार्याची जाणीव ठेवून शुभम आणि प्रवीण यांनी आपल्या वाढदिवसाचा आनंद या बांधवांसोबत वाटण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली, नवीन कपडे दिले आणि फळांचे वाटप करून त्यांच्या आनंदात भर घातली. वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ स्वतःचा आनंद साजरा न करता गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा त्यांचा प्रयत्न उपस्थितांसाठी भावस्पर्शी ठरला. Voice of Media
तरुणाईसमोर सामाजिक बांधिलकीचा आदर्श
या उपक्रमात शुभम बारसागडे यांचे आई-वडील, व्हॉईस ऑफ मीडियाचे चिमूर तालुकाध्यक्ष पंकज मिश्रा, साप्ताहिक विंगचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश डांगे, तालुका कार्यकारिणी सदस्य नरेंद्र नागोसे, शुभम मोरे, कुंदन पडवेकर यांच्यासह मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
वैयक्तिक आनंदाच्या प्रसंगी समाजातील गरजू आणि वंचित घटकांचा विचार करून त्यांना मदतीचा हात देण्याची भावना या उपक्रमातून अधोरेखित झाली. वाढदिवस साजरा करण्याची ही वेगळी पद्धत तरुणाईला सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देणारी ठरत आहे. स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शुभम बारसागडे व प्रवीण वाघे यांच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
“आनंद वाटल्याने द्विगुणित होतो!”
या उपक्रमाविषयी बोलताना शुभम बारसागडे आणि प्रवीण वाघे म्हणाले, “पार्ट्या आणि अनावश्यक खर्चातून मिळणारा आनंद क्षणभंगुर असतो. मात्र, समाजातील उपेक्षित आणि निराधार बांधवांना छोटीशी मदत केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर फुलणारे हास्य मनाला खरे समाधान देते. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतूनच आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे.”
त्यांच्या या सामाजिक उपक्रमातून वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस नसून समाजाप्रती आपली जबाबदारी जपण्याची संधीही ठरू शकतो, हा सकारात्मक संदेश देण्यात आला.
