Wednesday, October 7, 2026
HomeCrimeCSTPS कॉपर चोरीने सुरक्षा यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात

CSTPS कॉपर चोरीने सुरक्षा यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात

चंद्रपूर :- चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (CSTPS) मधील कोट्यवधी रुपयांच्या कॉपर केबल चोरीप्रकरणाने महाजेनकोच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. CISF, MSF तसेच मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात असतानाही ट्रकभर कॉपर बाहेर कसा गेला, असा सवाल उपस्थित करीत शिवसेनेने या प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणासंदर्भात चंद्रपूरातील विविध दैनिकांमध्ये २१, २७, ३० सप्टेंबर तसेच २ ऑक्टोबर रोजी आरोपींना अटक, ट्रक जप्त आणि चोरीच्या नेटवर्कसंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, चोरी नेमकी कशी घडली आणि सुरक्षा यंत्रणांना त्याचा थांगपत्ता कसा लागला नाही, हा मूळ प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष, शिवसेना भारतीय कामगार संघटना, चंद्रपूर यांनी महाजेनकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, मुंबई यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीसाठी १२ मुद्दे मांडले आहेत.

चोरीच्या काळातील CISF व MSFची गेटवरील सुरक्षा व्यवस्था, वाहन तपासणी, प्रवेश-निर्गमन रजिस्टर, गेट पास, CCTV फुटेज, ड्युटी चार्ट आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचे अहवाल तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच CTPSमधील अधिकारी-कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, कंत्राटदार, वाहन मालक-चालक आणि बाहेरील व्यक्ती यांच्यात संगनमताची शक्यता असल्यास ती पुराव्यांच्या आधारे तपासावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यासोबतच मागील पाच वर्षांतील कॉपर, पाईप व स्क्रॅप चोरीच्या घटनांची चौकशी करून स्टॉक रजिस्टर, मटेरियल रजिस्टर, स्क्रॅप रेकॉर्ड, गेट पास आणि जुन्या तक्रारींची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. CTPSमधील कॉपर केबलच्या एकूण साठ्याची तांत्रिक तपासणी करून चोरीचे नेमके प्रमाण आणि झालेल्या आर्थिक नुकसानीचे मूल्य निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

चोरीत वापरण्यात आलेल्या ट्रकची संपूर्ण माहिती, तो CTPSमध्ये कोणत्या गेटने व कोणाच्या परवानगीने आला, वाहनाची तपासणी कोणी केली, कोणत्या गेटने तो बाहेर गेला, यासह संबंधित CCTV फुटेज व रजिस्टर तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाजेनको सुरक्षा व्यवस्थेवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. त्या तुलनेत सुरक्षा व्यवस्था किती प्रभावी आहे, याचे स्वतंत्र सुरक्षा व आर्थिक ऑडिट करण्यात यावे, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे. तसेच शक्य त्या ठिकाणी स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवक व होमगार्ड यांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘केवळ आरोपींना अटक करून प्रकरण दाबू नका’

या प्रकरणात केवळ काही आरोपींना अटक करून प्रकरण संपवू नये. चोरीला संधी देणाऱ्या संपूर्ण प्रशासकीय व सुरक्षा साखळीची चौकशी करावी, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. चौकशीत अधिकारी, सुरक्षा कर्मचारी अथवा कंत्राटदार दोषी आढळल्यास त्यांच्यावर सेवाशिस्त व कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, तसेच चोरीचे प्रमाण, आर्थिक नुकसान, सुरक्षा त्रुटी आणि जबाबदार व्यक्तींसह संपूर्ण चौकशी अहवाल जनतेसमोर जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सात दिवसांत स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त न केल्यास CTPSच्या मुख्य गेटसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना भारतीय कामगार संघटनेने दिला आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular