Sunday, September 20, 2026
HomeAccidentचंद्रपूर पोलिसांच्या ताफ्यात १४ नवीन वाहने

चंद्रपूर पोलिसांच्या ताफ्यात १४ नवीन वाहने

चंद्रपूर :- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच पोलीस दलाची कार्यक्षमता, गती आणि गतिशीलता वाढविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात १४ नवीन वाहने दाखल झाली आहेत. यासोबतच शहरातील संवेदनशील भाग, गर्दीची ठिकाणे, मोर्चे आणि सण-उत्सवांदरम्यान प्रभावी निगराणीसाठी दोन अत्याधुनिक ‘मोबाईल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन’ सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत. या वाहनांचा लोकार्पण सोहळा शनिवार, १९ सप्टेंबर रोजी पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे उत्साहात पार पडला.

महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) निधीतून ही आधुनिक वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, विधान परिषद सदस्य आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे यांच्यासह जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आदी अधिकारी उपस्थित होते.

गर्दीच्या ठिकाणी आता थेट नजर
शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या मोबाईल सीसीटीव्ही व्हॅनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या व्हॅनच्या माध्यमातून संवेदनशील भाग, मोठ्या गर्दीची ठिकाणे, मोर्चे तसेच सण-उत्सवांच्या काळात पोलिसांना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवता येणार आहे.

व्हॅनवर बसविण्यात आलेले ३६० अंश फिरणारे हाय-डेफिनिशन PTZ व नाईट-व्हिजन कॅमेरे दूरपर्यंत स्पष्ट चित्रण करण्यास सक्षम आहेत. कॅमेऱ्यांचे थेट नियंत्रण कक्षाशी कनेक्शन असल्याने घटनास्थळावरील हालचालींचे Live Monitoring करता येणार आहे.

मोबाईल कंट्रोल रूमची सुविधा
व्हॅनमध्ये आधुनिक मॉनिटर्स, व्हिडिओ रेकॉर्डिंग व स्टोरेजची सुविधा तसेच Public Address System उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रण, आपत्कालीन परिस्थिती आणि सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने निर्णय घेण्यास पोलिसांना मदत होणार आहे.

गस्त आणि आपत्कालीन प्रतिसादाला वेग
नवीन वाहनांमुळे जिल्ह्यातील पोलीस गस्त अधिक प्रभावी होण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था राखणे आणि आपत्कालीन परिस्थितीला तत्परतेने प्रतिसाद देणे सुलभ होणार आहे.

आधुनिक सीसीटीव्ही व्हॅनमुळे सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची नजर अधिक प्रभावी होऊन गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

सक्षम पोलीस दल, सुरक्षित चंद्रपूर’ या उद्दिष्टाला आधुनिक वाहनांची जोड मिळाल्याने जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेला नवी गती मिळणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मोटार परिवहन विभाग, पोलीस कल्याण विभाग, बिनतारी संदेश विभाग, सायबर पोलीस स्टेशन आणि पोलीस मुख्यालयातील अधिकारी व अंमलदारांनी केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular