Saturday, June 13, 2026
HomeCrimeसिंदेवाहीत सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त

सिंदेवाहीत सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त

सिंदेवाहीत सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त; मुख्य तस्कर पोलिसांच्या ताब्यात
सिंदेवाहीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूवर पोलिसांचा छापा; अडीच लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) LCB चंद्रपूरच्या पथकाने सिंदेवाही येथे धाडसी कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व हुक्का साहित्याचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत २ लाख ८४ हजार ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सिंदेवाही येथील आझाद चौक परिसरातील काही खोल्यांमध्ये अवैधरित्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व हुक्का शिशा साहित्याचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईदरम्यान सागर प्रमोदराव केकरे (वय ३४, रा. आझाद चौक, सिंदेवाही) याला ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळाची झडती घेतली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू आणि हुक्का शिशा तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपीला पुढील कारवाईसाठी सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.

या प्रकरणी सिंदेवाही पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर पुरवठादार व संबंधित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काटकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईत सपोनि दीपक कोंक्रेटवार, पोउपनि विनोद भुरले, सर्वेश बेलसरे तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular