The Modi government has turned the education system into a marketplace
चंद्रपूर :- देशभरात गाजत असलेल्या NEET 2026 पेपर लीक प्रकरणावर चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि परीक्षा आयोजन यंत्रणेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या प्रकारामुळे देशातील शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास उध्वस्त झाल्याची तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. NEET exam scam amounts to playing with the future of students
श्री. धोटे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील तब्बल २२ लाखांहून अधिक विद्यार्थी वर्षभर रात्रंदिवस मेहनत करून NEET सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेची तयारी करतात. गरीब, शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील मुलं मोठी स्वप्नं घेऊन अभ्यास करतात; मात्र काही मोजक्या भ्रष्ट दलाल, पेपर माफिया आणि निष्क्रिय प्रशासनामुळे त्यांचे भविष्य पैशाच्या बाजारात विकले जात आहे. परीक्षा सुरू होण्याच्या तब्बल ४२ तास आधी WhatsApp सारख्या माध्यमांवर प्रश्नपत्रिका विकली जात असल्याच्या बातम्या अत्यंत धक्कादायक आहेत. ते पुढे म्हणाले की, ही घटना पहिल्यांदाच घडलेली नाही.
गेल्या दहा वर्षांत देशभरात तब्बल ८९ पेपर लीक प्रकरणे समोर आली असून ४८ वेळा परीक्षा पुन्हा घ्यावी लागली आहे. प्रत्येक वेळी सरकार चौकशी आणि कठोर कारवाईची भाषा करते; मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी सुरू असलेला हा खेळ थांबलेला नाही. ही केवळ प्रशासनाची अपयशी व्यवस्था नसून तरुणांच्या स्वप्नांवरचा घात आहे.
नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका करताना धोटे म्हणाले की, मोदी सरकारने देशातील युवकांना रोजगार, शिक्षण आणि सुरक्षित भविष्याची आश्वासने दिली होती; परंतु आज विद्यार्थ्यांना मिळतेय ती फक्त निराशा, अन्याय आणि भ्रष्टाचार. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याऐवजी परीक्षा प्रक्रियेलाच संशयाच्या भोवऱ्यात ढकलण्यात आले आहे. देशातील तरुणांच्या स्वप्नांसाठी मोदी सरकारपेक्षा मोठा धोका दुसरा कोणी नाही.
या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, पेपर लीकमध्ये सहभागी असलेल्या माफिया आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्वतंत्र आणि पारदर्शक परीक्षा सुरक्षा यंत्रणा उभारावी, अशी मागणीही त्यांनी केली. शेवटी विद्यार्थ्यांना धीर देताना सुभाषभाऊ धोटे म्हणाले की, देशातील युवक एकटे नाहीत. काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात त्यांच्या सोबत ठामपणे उभा आहे. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणे ही काळाची गरज आहे आणि ही व्यवस्था बदलल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही.
