JCI Chandrapur Power City and RERA360’s Grand 3-Day Mega PR Event
चंद्रपूर : शहरातील सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी JCI चंद्रपूर पॉवर सिटी आणि RERA360 यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ३ दिवसीय मेगा PR कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात विद्यार्थ्यांपासून ते पालक आणि नागरिकांपर्यंत सर्वच घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी भव्य ड्रॉईंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा ग्रेड I ते III आणि ग्रेड IV ते VIII अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला होता. स्पर्धेसाठी आवश्यक असलेले ड्रॉईंग साहित्य आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन श्रेष्ठ रघुवंशी महर्षी पुरस्कार विजेते संत मनीष जी महाराज यांच्या हस्ते झाले. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त कलाकार सुदर्शन बारापात्रे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. जिल्ह्यातील विविध शाळांना वैयक्तिकरित्या लेखी आमंत्रणे पाठविण्यात आली होती तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कार्यक्रमाचा व्यापक प्रचार करण्यात आला. परिणामी, ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच जिल्हाभरातील सुमारे ५० इन्फ्लुएन्सर्सनी कार्यक्रमाला भेट देऊन त्याचे कव्हरेज केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी पालकांसाठी ‘Parenting’ विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी तज्ञांनी मुलांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका, संवादाचे महत्त्व आणि आधुनिक काळातील पालकत्वातील आव्हाने याबाबत मार्गदर्शन केले. याच दिवशी उपस्थित महिलांसाठी लकी लेडी स्पर्धा, विविध मनोरंजक खेळ आणि तंबोला यांचे आयोजन करून वातावरणात आनंदाची रंगत आणली.
तिसऱ्या दिवशी कार्यक्रमाचा समारोप बक्षीस वितरण सोहळा आणि मेगा हेल्थ चेकअप कॅम्प यांच्या माध्यमातून करण्यात आला. या आरोग्य शिबिराचा सुमारे १०० नागरिकांनी लाभ घेतला. ड्रॉईंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
संपूर्ण ३ दिवसांच्या या भव्य कार्यक्रमात जवळपास १००० नागरिकांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, संस्कार आणि आरोग्य यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम शहरात विशेष चर्चेचा विषय ठरला.