House burglary in Bhadravati, two accused arrested
चंद्रपूर :- भद्रावती शहरातील पंचशील वॉर्ड येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा भद्रावती पोलिसांनी अल्पावधीत छडा लावून दोन आरोपींना अटक केली आहे. गुन्ह्यातील चोरीस गेलेली रोख रक्कम पैकी ९२५० रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. Burglary Crime
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाडुरंग लहानुजी रामटेके (७० वर्ष) रा. पंचशील वॉर्ड, भद्रावती हे दिनांक २३ जून २०२५ रोजी सकाळी ६ वाजता नागपूर येथे मुलाकडे जाण्यासाठी घराला कुलूप लावून गेले होते. दिनांक २७ जून रोजी नागपूरमध्ये असताना त्यांना नातवाने करण उमरीकर याने फोन करून घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे सांगितले. रामटेके नागपूरहून तात्काळ परतल्यावर पाहिले असता घराचा दरवाजा उघडा दिसून, कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त होत्या. कपाटातील लॉकरमधून ७१,५०० रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी पाडुरंग रामटेके यांनी भद्रावती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) भादंवि नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासा दरम्यान भद्रावती पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार, दोन युवकांची चौकशी करण्यात आली. त्यात आरोपी धनेंद्र संगराज पिपलांगे (१९), रा. भगतसिंग वॉर्ड, बल्लारपूर) व अमन उर्फ टिंगु इंद्रकुमार निषाद (१९) रा. भगतसिंग वॉर्ड, बल्लारपूर) यांना अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान आरोपींनी चोरी केलेल्या रकमेपैकी काही रक्कम खाण्या-पिण्यात खर्च केल्याचे सांगितले. उर्वरित ९२५० रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. Bhadravati Police Station
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात तपास पथकात पोउपनि गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, जगदिश झाडे, अनुप आष्टुनकर, विश्वनाथ चुदरी, योगेश घाटोळे आणि खुशाल कावळे यांचा समावेश होता.
पोलिसांकडून नागरिकांना आवाहन
भद्रावती पोलिसांनी नागरिकांना सूचना दिल्या आहेत की, प्रवासासाठी घर बंद करताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत व संशयित हालचाली दिसल्यास पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा.