📰 विदर्भ राज्य आंदोलन समितीमार्फत चंद्रपूर जिल्ह्यात नागपूर कराराची होळी
चंद्रपूर :- विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज चंद्रपूर जिल्ह्यासह विविध ठिकाणी नागपूर कराराची होळी करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ७२ वर्षांपूर्वी २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार झाला होता. या कराराच्या अंमलबजावणीसाठी सरकारने अनेक आश्वासने दिली होती. मात्र करारातील अटी व शर्तींवर आजवर पाळले गेले नसल्याचा ठपका उपस्थित करण्यात आला.
करारातून विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात विकासाऐवजी विदर्भ प्रदेशावर अन्यायच झाला, असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. मुबलक पाणी, सुपिक जमीन, खनिजे, वनसंपदा असूनही हा प्रदेश मागासलेला राहिला. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, दारिद्र्य, कुपोषण, नक्षलवाद, प्रदूषण आणि निधीचा प्रचंड अनुशेष यामुळे विदर्भाचे चित्र दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालले आहे.
चंद्रपूर शहरातील जेटपुरा गेट, गांधी पुतळ्यासमोर तसेच राजुरा येथे संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर, गोंडपिपरी येथे गांधी चौकात, कोरपना येथे बसस्थानक चौकात आणि जीवती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर या सर्व ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी नागपूर कराराच्या प्रती जाळून शासनाच्या धोरणाविरुद्ध संताप व्यक्त केला.
या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने व स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून या निषेध आंदोलनात सहभाग घेतला.