Sunflag carried out unauthorized construction without obtaining a ‘no objection’ certificate from the Gram Panchayat
चंद्रपूर :- बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) व विसापूर परिसरात सनफ्लॅग आयर्न अॅन्ड स्टील कंपनी लिमिटेडच्या आर्यन अंडरग्राऊंड कोल माईन प्रकल्पाची तयारी सुरू आहे. मात्र, या प्रकल्पाच्या नावाखाली ग्रामपंचायतीची ‘ना हरकत’ न घेता तसेच आवश्यक परवानग्यांशिवाय कंपनीने थेट सुरक्षा भिंत व इतर बांधकामे उभारल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. Sunflag carried out unauthorized construction without obtaining a ‘no objection’ certificate
केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कोल बेल्टनुसार सुमारे ८०२ हेक्टर शेतजमीन अधिग्रहित करणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात कंपनीने केवळ १२ हेक्टर जमीनच अधिग्रहित केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या जमिनीखालून थेट कोळसा उत्खनन करण्याचा कंपनीचा डाव असल्याचा आरोप ग्रामपंचायत व ग्रामसेवा समितीने केला आहे. जमीन अधिग्रहण, मोबदला आणि ग्रामपंचायतीची परवानगी न घेता उभारलेली ही बांधकामे म्हणजे स्थानिक जनतेशी केलेला उघड दगाफटका असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर ग्रामसेवा समिती व ग्रामपंचायतच्या वतीने कंपनीला नोटीस बजावण्यात आली असून, अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवावे, अन्यथा कंपनीविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आयोजित पत्रकार परिषदेत ग्रामपंचायत व ग्रामसेवा समितीचे अध्यक्ष सूर्या अडबाले यांनी दिला.
सनफ्लॅग आयर्न अॅन्ड स्टील कंपनी लिमिटेडच्या Sunflag Iron and Steel Company Limited शिवकुंड अंडरग्राऊंड कोल माईन्स अंतर्गत सध्या 5 अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. या बांधकामांसाठी आवश्यक शासकीय व स्थानिक परवानग्या न घेता कंपनीने मनमानी सुरू केल्याचा आरोपही करण्यात आला.
दरम्यान, कंपनीकडून स्थानिक भूमिपुत्रांना सरसकट रोजगार देण्यात येत नसल्याचा, तसेच अधिग्रहित जमिनीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना न दिल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. केवळ १२ हेक्टरवर बांधकाम करून उर्वरित ८०२ हेक्टर क्षेत्राखालून उत्खनन करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत व ग्रामसेवा समिती कदापि सहन करणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.
कंपनीचे एजंट गावकऱ्यांना आमिष दाखवून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ‘विरोध नाही’ असे दाखवत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. अशा एजंटांना धडा शिकवण्यात येईल आणि सनफ्लॅग आयर्न अॅन्ड स्टील कंपनीचा हा प्रकल्प परिसरात होऊ देणार नाही, असा सरसकट इशारा देण्यात आला.
जोपर्यंत ग्रामपंचायत व ग्रामसेवा समिती आमसभेत एकमताने ठराव करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करत नाहीत, तोपर्यंत केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सर्व परवानग्या रद्द करून प्रकल्पाच्या संपूर्ण कामकाजाला स्थगिती द्यावी, अशी ठाम मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
पत्रपरिषदेत सरपंच कविता वैद्य, उपसरपंच मल्लेश कोठारी, विसापूरच्या सरपंच वर्षा कुळमेथे, श्री छत्रपती शिवाजी महाराज समितीचे बंडू गिरडकर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.