चंद्रपूर :- विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एकूण ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी दरम्यान करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी केली. यावेळी संशयास्पद रेनॉल्ट डस्टर या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारू आढळून आली. Smuggling of foreign liquor in a four-wheeler
या कारवाईत नागेश पोचणा पाकूळवार (वय ३८, रा. भेंडवी, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) आणि मुरली वेंकटाद्री पचवा (वय २९, रा. भेंडवी, ता. राजुरा) यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी कारवाई दरम्यान रेनॉल्ट डस्टर कार (क्र. MH 40 AC 9855) किंमत अंदाजे ५ लाख रुपये जप्त केली. तसेच त्यामध्ये 90 मिलीच्या सह्याद्री व्हिस्कीच्या 100 बाटल्या (किंमत 10 हजार रुपये), 180 मिलीच्या रॉयल स्टॅग विदेशी दारूच्या 48 बाटल्या (किंमत 12 हजार रुपये) आणि 90 मिलीच्या रॉयल स्टॅगच्या 200 बाटल्या (किंमत 30 हजार रुपये) असा दारूसाठा आढळून आला, वाहनासह दारूसाठ्याची एकूण किंमत 5 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ९१८/२०२६, कलम ६५(अ), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात उपविभाग राजुरा पथक व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या पथकाने केली.