Grand Lecture Organized on the Occasion of Emperor Ashoka Jayanti
चंद्रपूर :- विश्वभूषण महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या शताब्दी वर्षानिमित्त चंद्रपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त भव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम दि. २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे होणार आहे. या कार्यक्रमास शहरातील जागृत व बुद्धिवंत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समता सैनिक दल शताब्दी महोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

समता सैनिक दलाला 100 वर्षे पूर्ण होत असून, या शताब्दी महोत्सवानिमित्त चंद्रपूर येथे समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी दिलीप वावरे, उपाध्यक्षपदी धम्मदीप मेश्राम व अॅड. राजेश वनकर, कार्याध्यक्षपदी गौतम येसांबरे, सचिवपदी अनंत बाबरे, सहसचिवपदी गौरव धाकडे, कोषाध्यक्षपदी मार्शल अमर्त्य, सह-कोषाध्यक्षपदी रुपेश वालकोंडे, तर मिडिया प्रमुखपदी निखिल पेसांबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सम्राट अशोक यांनी आपल्या शौर्याच्या बळावर अखंड भारतात सत्ता प्रस्थापित केली. मात्र, कलिंग युद्धानंतर झालेल्या प्रचंड जीवितहानीने व्यथित होऊन त्यांनी युद्धाचा त्याग करत अहिंसा, शांती आणि बुद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यांनी संपूर्ण जगात बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार करत मानवतेचा संदेश दिला.
या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बौद्धकालीन इतिहासकार, लेणी व शिल्पकला तज्ञ महेंद्र शेगावकर हे ‘प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जीवनावर’ व्याख्यान देणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ मार्शल गौरीशंकर टिपले यांच्या हस्ते होणार असून, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अशोक खचाडे, मार्शल रंजना वासे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप वावरे राहतील.
समितीतर्फे वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
