An initiative of ‘Reading volition Maharashtra’ to cultivate the reading culture of students
चंद्रपूर :- वाचन संस्कृती जोपासण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील ग्रंथालय संचालनालय अंतर्गतची जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालये व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दरवर्षी दि. 1 ते 15 जानेवारी या कालावधीत वाचन पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दि. 20 डिसेंबर, 2024 रोजी शासन निर्णय निर्गमीत केला आहे. ‘Reading volition Maharashtra’ to cultivate the reading culture of students
सदर उपक्रमातंर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन :
सामुहिक वाचन : नववर्षाच्या सुरवातीला 1 जानेवारी 2025 रोजी ग्रंथालय संचालनालयाच्या अधिपत्याखालील सार्वजनिक ग्रंथालयामध्ये विद्यार्थी आणि ग्रंथालय सदस्यांच्या आवडीनुसार पुस्तकाचे वाचन करण्याचा सामुहिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे छायाचित्र सार्वजनिक ग्रंथालयांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास ई-मेलव्दारे पाठवावे.
*वाचन कौशल्य कार्यशाळा* : निरंतर व सतत वाचनाची सवय लागावी, यासाठी कोणती पुस्तके वाचावीत, कशी वाचावीत, याबाबत मार्गदर्शन करणारी वाचन कौशल्य कार्यशाळा शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी आयोजित करावी. यावेळी वाचन कौशल्याविषयी मुलभूत संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगाव्यात. पुस्तक परीक्षण व पुस्तक कथन स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांची नोंदणी करावी.
वाचनसंवाद : स्थानिक लेखकांना ग्रंथालयात निमंत्रीत करून वाचक व लेखक परिसंवादाचे आयोजन करावे. जेणेकरून स्थानिक लेखकांना प्रोत्साहन मिळेल आणि विद्यार्थ्यांना नवसाहित्याची ओळख होईल.
ग्रंथ प्रदर्शन : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत व जिल्हयातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमार्फत नजीकच्या महाविद्यालयांमध्ये ग्रंथालयातील विशिष्ट विषयावर जसे, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमाची पुस्तके, आरोग्य विषयक पुस्तके, ऐतिहासिक पुस्तके, विशिष्ट लेखकांच्या कथा, कादंबरी किंवा ग्रंथालयात उपलब्ध पुस्तकांचे प्रदर्शन यासारखे विविध उपक्रम आयोजित करून जिल्ह्यात वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. नलावडे यांनी कळविले आहे.