MSEDCL’s ‘Natyakumbh 2025’, Nagpur regional level inter-regional drama competition, inaugurated
चंद्रपूर :- विदर्भापासून कोकणापर्यंत सव्वा तीन कोटी वीजग्राहकांना वर्षातील प्रत्येक दिवस व दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला महावितरणकडून सेवा दिली जाते. या सेवेत चांगले किंवा वाईट असे बरेच नाट्यपूर्ण अनुभव अधिकारी व कर्मचाऱ्यांना येतात. या नाट्यपूर्ण अनुभवांना समाजासमोर मांडण्यासाठी नाट्यकृतींमध्ये स्थान मिळावे अशी अपेक्षा महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी केले.
महावितरणच्य ‘नाट्यकुंभ २०२५’ नागपूर प्रादेशिकस्तरीय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे उद्घाटन, दि. २ मे रोजी संचालक श्री. पवार यांच्याहस्ते झाले. MSEDCL’s ‘Natyakumbh 2025’, Nagpur regional level inter-regional drama competition

यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक श्री परेश भागवत, मुख्य अभियंते सर्वश्री सुहास रंगारी, दिलीप दोडके, राजेश नाईक, नाट्यस्पर्धेचे स्वागताध्यक्ष श्री हरीश गजबे, परिक्षक श्री विनोद दुर्गेपुरोहित, श्री जयदेव सोमनाथे, अँड चैताली बोरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
महावितरण फार मोठा परिवार आहे. आपल्या परिवारात अनेकजणांकडे उत्तम कलागुण आहेत. MSEDCL महावितरणचे दैनंदिन काम सांभाळून त्यांनी हे कलागुण जपले आहेत. नाट्यस्पर्धेमुळे आपल्यातील कलाकारांना आपली क्षमता सादर करण्याची संधी मिळते. अशा स्पर्धांमुळे महावितरणमध्ये अधिकारी व कर्मचा-यांमध्ये सुसंवाद वाढतो, टीम स्पिरिट बळकट होते. असे सांगताना श्री पवार पुढे म्हणाले की, महावितरणचे काम अखंड चालणारे आहे. विदर्भापासून कोकणापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या विशाल भूमीवरील कोट्यवधी ग्राहकांना महावितरण सेवा देते.
वर्षातील प्रत्येक दिवस आणि दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला आपण लोकाना सेवा देत असतो. आपल्या कामातही अनेक नाट्यपूर्ण अनुभव येतात. आपल्या कामात जनतेची सेवा करताना आलेल्या नाट्यपूर्ण अनुभवांनाही आपण समाजासमोर मांडले पाहिजे. असेही ते म्हणाले.
विदर्भाला नाट्यकलेची खूप मोठी परंपरा आहे. कालिदासापासून ते महेश एलकुंचवारांपर्यंत नाट्यकलेला उतम योगदान देणारे अनेक नाटककार विदर्भाच्या भूमीत झाले आहेत. रामटेकला कालिदास, भंडारा जिल्ह्यात भवभूती, वाशीमला राजशेखर, अंभोऱ्याला मुकुंदराज, रिद्धपूरला चक्रधर स्वामी या साऱ्यांनी नाट्यपरंपरेला बळ देणारे लेखन केले आहे. मराठीतील दोन दिग्गज नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व राम गणेश गडकरी या दोघांचेही आयुष्याच्या उत्तरार्धातील वास्तव्य विदर्भात होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील वीर वामनराव जोशी यांचे ‘रणदुंदुभी’ हे नाटक महाराष्ट्रभर गाजले होते. झाडीपट्टी हा पूर्व विदर्भातील लोकप्रिय नाट्य प्रकार आहे, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील झाडीपट्टीला देखील सुमारे दीडशे वर्षांची दीर्घ परंपरा लाभली आहे. लोकसंस्कृतीचा भाग असलेली दंडार आणि नंतरची झाडीपट्टी हा विदर्भाचा अपूर्व ठेवा ठरला आहे. नागपूरच्या दलित रंगभूमीनेही उत्तम काम केले आहे. अशा या पूर्व विदर्भामध्ये समृद्ध नाट्य परंपरेच्या वातावरणात ही स्पर्धा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
महावितरणचे काम है तांत्रिक स्वरुपाचे असते. पण केवळ तांत्रिक ज्ञान पुरत नाही. आपल्याला जनतेला थेट सेवा द्यायची असते. त्यामुळे लोकांशी व्यवहार करताना संभाषण कला उपयुक्त ठरते. काही वेळा काही अधिकारी संकट प्रसंगी नाट्यकलाही वापरतात. दररोज तांत्रिक कामे करतानाही आपले कलागुण जोपासणाऱ्या महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना श्री पवार यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री परेश भागवत यांनी अशा स्पर्धांमुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संवाद वाढत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीश गजबे यांनी केले.
चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, येथे आयोजीत करण्यात करण्यात आलेल्या या दोन दिवसीय नाट्य महोत्सवात महावितरणच्या चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि अकोला परिमंडलांचे नाट्यसंघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. ३ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादिकर यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत असतील. त्यावेळी संचालक (वाणिज्य) श्री योगेश गडकरी, संचालक (वित्त) श्री अनुदिप दिघे आणि संचालक (मानव संसाधन) श्री राजेण्द्र पवार, संचालक (प्रकल्प) श्री प्रसाद रेशमे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
या दोन दिवसीय नाट्य स्पर्धेत चंद्रपूर परिमंडलाने श्रीपाद जोशी लिखित ‘रंगबावरी’ तर नागपूर परिमंडलाने प्रदीप फाटक लिखित ‘ये रे घना’ चा नाट्यप्रयोग सादर केला, तर दुसऱ्या दिवशी गोंदिया परिमंडल अतुल साळवे यांच्या ‘दि ॲनॉनीमस’ तर अकोला परिमंडल डॉ. चंद्रकांत शिंदे लिखित ‘सिकॅरिअस’ हे नाटक सादर करणार आहेत.
 
                                    


