Illegal liquor business is booming in Babupeth
चंद्रपूर :- शहरातील बाबूपेठ प्रभागातील गौरी तलाव परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायामुळे स्थानिक रहिवाशांचे जीवन विस्कळीत झाले असून, या प्रकारावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आम आदमी पक्षाने प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केलीअसून त्वरित कारवाई करण्यात यावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन सादर करण्यात आले आहे. Illegal liquor business is booming in Babupeth
गौरी तलाव परिसरात दारू विक्रेता राहत्या ठिकाणी बिनधास्तपणे दारू विक्रीचा व्यवसाय करत असून, त्यांच्याकडे येणारे दारूडे वारंवार अघोर कृत्य करत आहेत. नग्न अवस्थेत फिरणे, सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणे, स्थानिकांशी वाद घालणे असे प्रकार रोजच्याच बाबी झाल्या आहेत. या प्रकरणी नागरिकांनी सिटी पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रारी दाखल केल्या आहेत, मात्र अद्याप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही.
या वाढत्या त्रासाविरोधात आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “बाबूपेठ परिसरातील शांतता भंग करणाऱ्या अवैध धंद्याविरोधात तातडीने कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आम्ही नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरू.”
राजू कुडे यांनी प्रशासनावर बोट ठेवत असेही म्हटले की, “अवैध धंद्यांमुळे अल्पवयीन मुले देखील व्यसनांच्या आहारी जात आहेत. ड्रग्ज, गांजा, दारू अशा गोष्टी सर्रासपणे उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या निष्क्रियतेमुळे या अवैध धंद्यांना उत्तेजन मिळत आहे.”
अधीक्षक कार्यालय राज्य उत्पादन शुल्क विभागात निवेदन सादर करताना आम आदमी पक्षाचे राज्य संघटन सचिव सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, शहराध्यक्ष योगेश गोखरे, शहर संघटन मंत्री संतोष बोपचे, जिल्हा सचिव राज नगराळे, तसेच वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.