Elephants from Gadchiroli district in Tadoba Andhari Tiger Reserve
चंद्रपूर :- गडचिरोली जिल्ह्यातून ३० मे रोजी दोन हत्ती उमा नदी पार करून ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील कुकडहेटी गावात दाखल झाले. त्यानंतर ते कक्ष क्रमांक ८०८, २७०A आणि २७०B मार्गे जंगलाच्या दिशेने रवाना झाले . त्यानंतर काही वेळ त्यांनी नलेश्वर तलावाजवळ खेळण्याचा आनंद घेतला. ३० तारखेच्या रात्रीपर्यंत त्यांच्या पायांचे ठसे कंपार्टमेंट क्रमांक ३१९ मार्गे मुख्य गाभा क्षेत्राच्या दिशेने जात असल्याचे निदर्शनास आले. Elephants from Gadchiroli district in Tadoba Andhari Tiger Reserve
वन विभागाकडून ईडीसी सदस्य व स्थानिक ग्रामस्थांना सतर्कतेबाबत जागरूक केले जात आहे. पीआरटी आणि ईडीसी टीम्स या कामात सहभागी करण्यात आल्या आहेत. गावकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा तसेच जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला जात आहे. जंगलात एकटे फिरणे टाळण्याचे तसेच रात्री घराबाहेर झोपू नये, असेही आवाहन करण्यात येत आहे.
संपर्कातील इतर वनपरिक्षेत्रांतील कर्मचारी, बचाव पथक व एसटीपीएफचे कर्मचारी हत्तींच्या हालचालींचा मागोवा घेत आहेत. या टीम्सना रात्री पाहता येणारी उपकरणे (नाईट व्हिजन), IR ड्रोन आणि हत्ती हुसकावण्यासाठी आवश्यक साहित्य पुरवले आहे. हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना उंच ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. Tadoba administration keeping an eye on elephants
सर्व नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच कुठल्याही प्रकारची माहिती असल्यास तात्काळ नजीकच्या वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन क्षेत्र संचालक, ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांनी केले आहे.
 
                                    


