Tuesday, October 27, 2026
HomeAgricultureदिवाळीपूर्वी धान खरेदी सुरू करा; ४८ तासांत पैसे द्या - आ. सुधीर...

दिवाळीपूर्वी धान खरेदी सुरू करा; ४८ तासांत पैसे द्या – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर :- चंद्रपूरसह विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा, दिवाळीचा सण आर्थिक विवंचनेत नव्हे, तर समाधानाने साजरा करता यावा आणि वर्षभर कष्टाने पिकविलेल्या धानाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. खरीप हंगाम २०२६-२७ मधील आधारभूत किंमत योजनेंतर्गत धान खरेदी केंद्रे दिवाळीपूर्वी सुरू करावीत, तसेच छत्तीसगडच्या धर्तीवर धान विक्रीनंतर ४८ तासांच्या आत रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची व्यवस्था कार्यान्वित करावी, अशी मागणी आ.मुनगंटीवार यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनजी भुजबळ यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल वेळेत त्यांच्या हाती पडणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून, त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याशी आणि सणासुदीच्या आनंदाशी जोडलेली बाब आहे, अशी ठाम भूमिका पत्राद्वारे त्यांनी मांडली आहे. Begin paddy procurement before Diwali

महाराष्ट्रातील धान खरेदी व्यवस्था अधिक गतिमान आणि शेतकरीहिताची करण्यासाठी छत्तीसगड राज्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणाऱ्या परिणय फुके समितीने यासंदर्भातील प्रस्ताव विभागाकडे सादर केला आहे. या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेऊन आवश्यक प्रशासकीय मान्यता, आर्थिक तरतूद आणि तांत्रिक व्यवस्था निश्चित करावी, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. धान विक्रीनंतर मोबदल्यासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन विस्कळीत होते. शेतीचा पुढील हंगाम, मजुरी, कर्जाचे हप्ते आणि कौटुंबिक गरजा भागविताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे धान खरेदी आणि पैसे जमा होण्याची प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी पत्रात अधोरेखित केले आहे.

धान खरेदी केंद्रे दिवाळीपूर्वी सुरू करण्यासाठी शेतकरी नोंदणी, बारदाना, वजनकाटे, साठवणूक व्यवस्था आणि आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करून खरेदीचे वेळापत्रक तातडीने निश्चित करावे. शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी अनावश्यक प्रतीक्षा करावी लागू नये, तसेच तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय विलंबामुळे त्यांच्या अडचणींत भर पडू नये, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश द्यावेत. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या धानाचे चुकारे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणे अपेक्षित नाही. छत्तीसगडमध्ये धान विक्रीनंतर ४८ तासांच्या आत मोबदला देण्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून महाराष्ट्रातही अशी व्यवस्था प्रभावीपणे राबविण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला वेळेत त्यांच्या खात्यात जमा होऊन त्यांना आर्थिक दिलासा मिळावा, ही भूमिका आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रात अधोरेखित केली आहे.

शेतकऱ्यांनी वर्षभर रक्ताचे पाणी करून पिकविलेल्या धानाला हमीभाव मिळणे आणि त्या धानाचा मोबदला वेळेत मिळणे, या दोन्ही बाबी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्रे सुरू करणे आणि ४८ तासांत पैसे जमा करण्याची व्यवस्था कार्यान्वित करणे याला प्राधान्य देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular