चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांची आर्थिक अडचण आणि भाविकांच्या श्रद्धा लक्षात घेऊन खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी घेतलेल्या आग्रही भूमिकेला मोठे यश आले आहे. प्रशासनाने मंडळांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करत २१, २२ आणि २४ ऑक्टोबर या तीन दिवसांत विसर्जन मिरवणुकीस परवानगी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो भाविक आणि सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आदिशक्तीच्या आराधनेचा नवरात्रोत्सव चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या श्रद्धेने व उत्साहात साजरा होत आहे. या वर्षी नवमी व दशमीच्या तिथीमुळे अनेक मंडळांना २१ ऑक्टोबर रोजी विसर्जन करणे अडचणीचे ठरत होते. तसेच आगामी पदवीधर मतदारसंघाची २३ ऑक्टोबर रोजी होणारी निवडणूक लक्षात घेता, प्रशासनाने सुरुवातीला काही निर्बंध लादले होते. यामुळे मंडळांसमोर मोठे आर्थिक संकट आणि नियोजनाचा पेच निर्माण झाला होता.
यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून २३ ऑक्टोबरचा निवडणुकीचा दिवस वगळून २२ आणि २४ ऑक्टोबर रोजी विसर्जन मिरवणुकीस परवानगी देण्याची मागणी केली होती. लोकभावना आणि कायदा-सुव्यवस्था यांचा समतोल साधत प्रशासनाने आता २१, २२ आणि २४ ऑक्टोबर अशा तीनही दिवशी विसर्जन पार पाडण्यास मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे चंद्रपुरातील उत्सव मंडळांनी खासदार प्रतिभा धानोरकर आणि जिल्हा पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत. सर्व मंडळांनी पोलीस प्रशासनाच्या नियमांचे पालन करत शांततेत विसर्जन सोहळा पार पाडावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
“भाविकांच्या श्रद्धा आणि उत्सव मंडळांच्या अडचणींचा सन्मान करत प्रशासनाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. यामुळे मंडळांचे आर्थिक नुकसान टळले असून सर्व उत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहात संपन्न होईल.”
— खासदार प्रतिभा धानोरकर
