वणी :- ३ लाख ८२ हजार रुपयांचा धनादेश बाऊन्स झाल्याप्रकरणी वणी पोलिसांनी कारवाई करत संबंधित प्रकरणातील संशयित जमीर खान, रा. मावळा, जि. आदिलाबाद (तेलंगणा) याला तेलंगणातील मावळा गावातून ताब्यात घेतले. पोलिसांचे पथक त्याला रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वणी पोलीस ठाण्यात घेऊन आले. प्रकरणाची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. Cheque worth ₹3.82 lakh bounces; Wani police take action in Telangana
प्राप्त माहितीनुसार, वणी शहरातील मलिक चिकन ट्रेडर्सचे प्रोप्रायटर मोहम्मद अहमद तौकीर अहमद यांना जमीर खान याने ३ लाख ८२ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. हा धनादेश १९ जून २०२४ रोजी जारी करण्यात आला असून तो आदिलाबाद येथील कापूर व्यास्या बँक लिमिटेडच्या शाखेशी संबंधित होता.
सदर धनादेश बँकेत जमा केल्यानंतर २० जून २०२४ रोजी खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने ‘Funds Insufficient’ या कारणाने बाऊन्स झाला. त्यानंतर धनादेश देणाऱ्या व्यक्तीस २४ जून २०२४ रोजी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. ही नोटीस १ जुलै २०२४ रोजी प्राप्त होऊनही निर्धारित मुदतीत धनादेशाची रक्कम अदा करण्यात आली नाही.
त्यानंतर १७ जुलै २०२४ रोजी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात धनादेश, बँक रिटर्न मेमो, कायदेशीर नोटीस, टपाल पावती तसेच ट्रॅकिंग रिपोर्ट आदी आवश्यक कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करण्यात आली आहेत.
सदर प्रकरण परक्राम्य लिखत अधिनियम, १८८१ मधील कलम १३८ अंतर्गत न्यायालयीन प्रक्रियेत आहे. याच प्रकरणाच्या पुढील कारवाईसाठी वणी पोलिसांच्या पथकाने तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील मावळा गाव गाठून जमीर खान याला ताब्यात घेतले आणि वणी येथे आणण्यात आले आहे.
पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी तसेच पुढील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
