Maha e-Seva Kendras to stage a sit-in protest in Mumbai starting July 1st
चंद्रपूर :- राज्यातील महा ई-सेवा व आधार सेवा केंद्र चालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन स्तरावर अद्याप ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याने १ जुलै २०२६ पासून आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल स्तरीय महा ई-सेवा व आधार केंद्र संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या निवेदनातून समोर आली आहे. Maha e-Seva Kendras to stage a sit-in protest in Mumbai

या संदर्भात संघटनेने राज्यातील सर्व तहसीलदारांना निवेदन सादर केले असून, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही आणि भद्रावती तहसीलदारांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल सेवा ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम महा ई-सेवा केंद्रांमार्फत केले जात असले तरी केंद्र चालकांच्या विविध समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
संघटनेने यापूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्ये राज्यव्यापी कामबंद आंदोलन केले होते. तसेच विविध मागण्यांसंदर्भात न्यायालयीन याचिका दाखल करण्यासह शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान विभाग व संबंधित प्रशासनाकडे अनेकदा निवेदने देऊनही समाधानकारक निर्णय न झाल्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व महा ई-सेवा व आधार केंद्र चालकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेने केले असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
