accused sentenced to life imprisonment — Historic verdict by Chandrapur Special Court
चंद्रपूर :- एकतर्फी प्रेमातून आणि विवाहास नकार दिल्याच्या रागातून २७ वर्षीय तरुणीची गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला चंद्रपूर येथील अतिरिक्त सत्र तथा विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश श्रीमती आर. ए. शेख यांनी आरोपी विवेक ब्रह्मदास चौधरी याला दोषी ठरवत कठोर शिक्षा आणि दंड ठोठावला.
प्रकरणातील मृत तरुणीचे २०१६ मध्ये लग्न झाले होते. वैवाहिक जीवनात मतभेद निर्माण झाल्यानंतर ती नागभीड येथे आईकडे राहत होती. याच दरम्यान शेजारी राहणारा विवेक चौधरी तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. विवाहासाठी दबाव टाकत आरोपीने वारंवार धमक्या दिल्या होत्या.
१४ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी आरोपीने तरुणीच्या घरात बेकायदेशीर प्रवेश करून तिच्यावर चाकूने हल्ला केला. तरुणीची आई घरी परतल्यावर आरोपी गळा चिरत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. आरडाओरड होताच आरोपी मागील दरवाजाने पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर नागभीड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे न्यायालयात सादर केले.
खटल्यादरम्यान मृत तरुणीच्या आईची प्रत्यक्षदर्शी साक्ष, घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेला रक्ताने माखलेला चाकू तसेच नागपूर येथील प्रादेशिक न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचा (RFSL) डीएनए अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरला. आरोपीच्या कपड्यांवरील आणि चाकूवरील रक्ताचे नमुने मृत तरुणीच्या रक्ताशी जुळल्याचे वैज्ञानिक तपासात स्पष्ट झाले.
विशेष सरकारी वकील ॲड. एस. बी. रामटेके यांनी सरकार पक्षाची प्रभावी बाजू मांडली. न्यायालयाने सर्व पुरावे आणि साक्षींचा विचार करून आरोपीला भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दोषी ठरविले.
न्यायालयाने सुनावलेली शिक्षा :
कलम ३०२ (खून) : जन्मठेप व १५ हजार रुपये दंड
कलम ४५० (घरात घुसखोरी) : ३ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड
कलम ३५४-डी (स्टॉकिंग/पाठलाग) : २ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड
कलम ५०६ भाग-२ (गुन्हेगारी धमकी) : ३ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड
या निकालामुळे एकतर्फी प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या गुन्ह्यांविरोधात कठोर संदेश गेला असून वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावल्याने न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
