Groundbreaking Ceremony for Cement Concrete Roads and Drainage Construction at Khutala and Padoli
चंद्रपूर : तालुक्यातील खुटाळा व पडोली गावांच्या मध्यभागातून जाणाऱ्या मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाल्याने नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत ग्रामस्थांनी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांची भेट घेऊन मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री जिल्हा खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत महत्त्वाच्या विकासकामांना मंजुरी मिळाली. Cement Concrete Roads and Drainage Construction
यामध्ये खुटाळा येथे श्री. प्रफुल वधारे यांच्या घरापासून परिवर्तन प्लाझापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम तसेच पडोली येथे श्री. कासवटे यांच्या घरापासून श्री. गौरकार यांच्या घरापर्यंत नाली बांधकामाचा समावेश आहे.
या विकासकामांचे भूमिपूजन भाजपा युवा नेते रघुवीर अहीर यांच्या शुभहस्ते शनिवार, दि. १० मे २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने रघुवीर अहीर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना रघुवीर अहीर यांनी सांगितले की, पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर हे ग्रामीण भागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली खनिज विकास निधीतून तालुक्यात अनेक विकासकामे मार्गी लागत आहेत. भविष्यातही नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत विकासकामे करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला भाजपा ग्रामीण तालुकाध्यक्ष विनोद खेवले, नकुल वासमवार, सरपंच विक्की लाडसे, अजय चार्लेकर, भारत रोहणे, निवृत्ती शिंदे, घनश्याम मुरकूटे, ग्रामीण महिला आघाडीच्या दुर्गाताई बावणे, राधाताई वांढरे, ललिताताई चार्लेकर, मिराताई पायघन, सरिताताई गोटेफोडे, कौरासिया ताई आदी पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते तसेच खुटाळा व पडोली येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर रस्ता व नाली बांधकामामुळे गावातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारची कामे अत्यावश्यक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.