Take urgent measures on human-wildlife conflict; Congress submits memorandum to Chief Minister
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या पर्यावरणीय समस्यांकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष द्यावे आणि इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा तथा शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. Cancel the Lohardongri iron mine project immediately
या संदर्भात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि शहर अध्यक्ष संतोष लहामगे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात अंबिका प्रसाद दवे, माजी महापौर संगिता अमृतकर, महिला काँ. जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेनेकर, माजी अध्यक्ष सुनंदाताई धोबे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, चंद्रपूर जिल्हा सध्या गंभीर पर्यावरणीय आणि मानव-वन्यजीव संघर्षाच्या संकटातून जात आहे. या पार्श्वभूमीवर इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी ५ मार्च २०२६ पासून अन्नत्याग सत्याग्रह सुरू केले असून त्यांच्या आंदोलनाला काँग्रेसने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. निवेदनात म्हटले आहे की, ब्रह्मपुरी वनविभागातील लोहारडोंगरी येथे प्रस्तावित लोह खाण प्रकल्प ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अत्यंत महत्त्वाच्या भ्रमणमार्गात (कॉरिडॉर) येतो. या प्रकल्पामुळे सुमारे १८ हजारांहून अधिक वृक्षांची तोड होण्याची शक्यता असून त्यामुळे वन्यजीवांचा अधिवास नष्ट होण्याबरोबरच मानव-वन्यजीव संघर्ष आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या खाणीला देण्यात आलेली वन्यजीव विषयक परवानगी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच वर्षांत वाघांच्या हल्ल्यात जवळपास २०० ग्रामस्थांचा मृत्यू झाला असून २०२५ वर्षातच ४७ जणांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व आदिवासी नागरिक सतत भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नेमलेल्या ११ सदस्यीय तांत्रिक समितीच्या अहवालाची तातडीने अंमलबजावणी करून मानव-वन्यजीव संघर्षावर प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच चंद्रपूर शहर व जिल्हा वाढत्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडत असल्याचे नमूद करत प्रस्तावित खाणकामांमुळे हवा व पाण्याचे प्रदूषण अधिक वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित ठेवणे, जंगलांचे विखंडन थांबवणे आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी शासनाने ठोस धोरण राबवावे, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनाच्या शेवटी चंद्रपूरची समृद्ध वनसंपदा आणि वन्यजीव वाचवण्यासाठी मुख्यमंत्री यांनी वैयक्तिक लक्ष घालून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच आंदोलनकर्ते बंडू धोतरे यांचे आरोग्य खालावत असल्याने त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन शासनाने लवकर तोडगा काढावा, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.
मुख्य मागण्या : लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्प तात्काळ रद्द करावा, चंद्रपूर जिल्ह्याला ‘व्याघ्र जिल्हा’ घोषित करून मानव-वन्यजीव संघर्षासाठी विशेष आपत्कालीन आराखडा राबवावा, व्याघ्र भ्रमणमार्गांवर प्रस्तावित ओव्हरपास व अंडरपासची कामे तातडीने सुरू करावीत, रेस्क्यू सेंटर व टायगर सफारी प्रकल्पाला गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, बंडू धोतरे यांच्या प्रलंबित १७ मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.