Citizens inconvenienced due to sale of firecrackers in Nandgaon Pode
चंद्रपूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथे परवानगीशिवाय सुरू असलेल्या फटाक्यांच्या विक्रीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. या बेकायदेशीर विक्रीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, मनसेने संबंधित दुकाने तत्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. MNS demands immediate action against firecracker sellers
मनसे जनहित कक्षाच्या विधी विभागाचे बल्लारपूर तालुका अध्यक्ष राजेंद्र वर्मा यांनी ग्रामपंचायत कार्यालय व तहसीलदार यांना निवेदन देत नमूद केले की, या दुकानांमधून ज्वलनशील व स्फोटक स्वरूपाचे फटाके नियमबाह्यरीत्या विकले जात आहेत. त्यामुळे आकस्मिक आग किंवा स्फोटाची दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच दुकानदारांकडून योग्य पार्किंग व्यवस्था न केल्याने गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. “अशा बेकायदेशीर विक्रीला कोणाचे पाठबळ आहे? आणि एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची?” असा सवालही मनसेने प्रशासनाला विचारला आहे.
ग्रामपंचायत नांदगाव पोडे हद्दीत चार फटाक्यांची दुकाने परवानगीशिवाय सुरू असल्याचे निदर्शनास आले असून, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार नोंदविण्यात आली आहे. मनसेने तहसीलदारांना ही दुकाने तातडीने बंद करण्याचे आदेश निर्गमित करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मनसेकडून “मनसे स्टाईल आंदोलन” करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मनसेने पुढे मागणी केली आहे की
सर्व फटाके विक्रेत्यांनी योग्य परवानगी घेऊन नियमांचे पालन करावे,
विक्रीस्थळी अग्निसुरक्षा उपाययोजना अनिवार्य कराव्यात,
आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पार्किंगची योग्य सोय करण्यात यावी.
या संपूर्ण प्रकरणी जिल्हाधिकारी, तहसीलदार व ग्रामपंचायत यांनी तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे.