चंद्रपूर शहराकरीता स्वतंत्र जलस्त्रोत निर्माण करा.
खासदारांनी केला संसदेत प्रश्न उपस्थित.
चंद्रपूर :- सध्या दिल्ली येथे सुरु असलेल्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी केंद्र सरकार ला विविध प्रश्नांच्या माध्यमातून धारेवर धरले आहे. दि. 13 फेब्रूवारी रोजी त्यांनी उपस्थित केलेल्या चंद्रपूर शहरातील स्वतंत्र जलस्त्रोतासंदर्भात केंद्रीय मंत्र्यानी उत्तरे दिली. त्यासोबतच रोजगार हमी योजनेत गावात 100 दिवस काम मिळत नसल्याच्या प्रश्नावर देखील मंत्र्यांनी उत्तरे सादर केली.
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रपूर शहर महानगर पालिकेला स्वतःचा जलस्त्रोत उपलब्ध नसल्याने सीएसटीपीएस यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जलस्त्रोतावर अवलंबून राहावे लागत असल्याची खंत खासदार धानोरकर यांनी मांडलेल्या प्रश्नातून व्यक्त केली. तसेच, चंद्रपूर शहर महानगरपालिकेला स्वतःच्या जलस्त्रोताकरीता वर्धा नदीवर बंधारा निर्माण करुन सदर जलस्त्रोत महानगरपालिकेला देण्यात यावा अशी मागणी देखील खासदार धानोरकर यांनी प्रश्नातून केली होती. तसेच, खासदार धानोरकर यांनी ग्रामीण भागातील जनतेला रोजगार हमी योजने अंतर्गत 100 दिवस काम मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नागरीकांना कामाकरीता शहराकडे यावे लागत असल्याचा प्रश्न देखील सभागृहात उपस्थित केला.
सदर प्रश्नासंदर्भात सरकार ने गांभिर्यपुर्वक विचार करुन ग्रामीण भागातील नागरीकांना रोजगार हमी योजनेतून किमान 100 दिवस काम निश्चितच मिळणार याकरीता संबंबधीत यंत्रणेला आवश्यक त्या सुचना देणार असल्याचे आश्वासन दिले.
तसेच, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्वतंत्र जलस्त्रोताकरीता राज्य सरकार आंमडी व धानोरा या दोन ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून बंधाऱ्याचे काम होणार असल्याचे खासदार धानोरकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सांगितले. तसेच केंद्र सरकार सदर विषयाकरीता आवश्यक ती मदत करणार असल्याचे देखील मंत्री महोदयांनी दिलेल्या उत्तरात सांगितले.