खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मध्यस्थीनंतर भंते रत्नमणी थेरो यांचे उपोषण मागे*
*घुग्घुस येथील बौद्ध विहार व बोधिवृक्षाचा प्रश्न सुटला*
चंद्रपूर :- घुग्घुस शहरातील शांतिनगर येथील बोधिसत्व बुद्ध विहार आणि पवित्र बोधिवृक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भंते रत्नमणी थेरो यांच्या नेतृत्वात मागील १० दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर यशस्वीरित्या मागे घेण्यात आले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज प्रत्यक्ष उपोषण मंडपाला भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. खासदारांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आणि प्रशासनासह लॉयड्स कंपनीने सकारात्मक पावले उचलल्यानंतर भंते रत्नमणी थेरो यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन आपले उपोषण मागे घेतले.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढताना एक दाता जागा उपलब्ध करून देणार आहे. या जागेत २,००० स्क्वेअर फूट जागेत लॉयड्स घुग्घुस कंपनीच्या वतीने भव्य व सुसज्ज नवीन बुद्ध विहाराचे बांधकाम करून देण्यात येणार आहे. तसेच नवीन विहाराचे निर्माण कार्य पूर्ण होईपर्यंत सध्याचे जुने विहार पाडले जाणार नाही, असे आश्वासन कंपनी प्रशासन व स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
नवीन बुद्ध विहाराचे काम पूर्ण झाल्यानंतर तेथे पूर्ण धार्मिक आणि विधिवत परंपरेनुसार भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येईल. यासोबतच नवीन परिसरात पवित्र बोधिवृक्षाचे रोपण करून त्याचे जतन व संवर्धन करण्याची पूर्ण जबाबदारी लॉयड्स कंपनीने अधिकृतपणे स्वीकारली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पुढाकारामुळे संतप्त बौद्ध समाज आणि आंदोलकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून उपोषणकर्त्यांनी खासदारांचे आभार मानले.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी घुग्घुस नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष दीप्ती सोनटक्के, ठाणेदार राऊत, नायब तहसीलदार खंडाळे, नगरपरिषद उपाध्यक्ष राजू रेड्डी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुंदा जेणेकर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, तालुका काँग्रेस अध्यक्ष अनिल नरुले, बांधकाम सभापती रोशन पचारे, स्वच्छता व आरोग्य सभापती नुरुल सिद्धीकी, नियोजन सभापती रविष सिंग, नगरसेवक घुग्घुस नगरसेवक तोशिक शेख, नगरसेवक सुरज कन्नूर, चंद्रपूर शहर महानगरपालिका नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक राहुल चौधरी, दीपक मित्रा, अजहर शेख, दीक्षा सातपुते, पायल दुर्गे यांच्यासह स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व बौद्ध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
