Wednesday, September 23, 2026
HomeCrimeगणेशोत्सवापूर्वी पोलिसांचा गुन्हेगारांना दणका

गणेशोत्सवापूर्वी पोलिसांचा गुन्हेगारांना दणका

चंद्रपूर :- आगामी गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुका शांततेत, सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात आणि कायदा व सुव्यवस्थेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने सराईत गुन्हेगार व समाजकंटकांविरुद्ध व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम राबविली आहे. या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून, उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. Chandrapur Police crack down on criminals ahead of Ganeshotsav

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस ठाण्यांच्या ठाणेदारांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

६१५ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
शांतता भंग करण्याची शक्यता असलेल्या ६१५ सराईत गुन्हेगारांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ व १२९ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले आहे.

३९ गुन्हेगार जिल्ह्याबाहेर
जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या ३९ सराईत गुन्हेगारांना कायदेशीर प्रक्रियेद्वारे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. उत्सव काळात या व्यक्तींमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.

१,७६१ संशयितांवर ‘मिनी तडीपार’
गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता असलेल्या १,७६१ संशयित इसमांविरुद्ध BNSS कलम १६३ (२) अन्वये ‘मिनी तडीपार’ स्वरूपाची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

4 कुख्यात गुन्हेगार MPDA अंतर्गत स्थानबद्ध
वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या आणि समाजात दहशत निर्माण करणाऱ्या चार कुख्यात गुन्हेगारांवर MPDA Act अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

AI CCTV व्हॅनची तडीपार गुन्हेगारांवर नजर
चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी तडीपार केलेल्या गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक AI सर्व्हेलन्स CCTV कॅमेरा व्हॅनचा वापर सुरू केला आहे. हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांचे फोटो, चेहरे आणि संबंधित माहिती या प्रणालीमध्ये नोंदविण्यात आली आहे.
AI आधारित Face Recognition प्रणालीच्या माध्यमातून तडीपार गुन्हेगार जिल्ह्यात प्रवेश करताना आढळल्यास त्याची ओळख पटविण्यास मदत होणार आहे. संशयित व्यक्तीची ओळख पटल्यास संबंधित यंत्रणेला तत्काळ अलर्ट मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आदेशाचा भंग केल्यास कठोर कारवाई
तडीपारीचा आदेश लागू असताना विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या अथवा फिरताना आढळणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कायद्यानुसार तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत, नियमांचे पालन करून आणि पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करावा. तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular