Wednesday, September 23, 2026
HomeCulturalगणेश विसर्जनासाठी चंद्रपूर शहरात ‘ट्रॅफिक प्लॅन’

गणेश विसर्जनासाठी चंद्रपूर शहरात ‘ट्रॅफिक प्लॅन’

चंद्रपूर :- गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक वाहतूक नियोजन केले आहे. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आला असून, मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी केले आहे. Traffic plan implemented in Chandrapur city for Ganesh Visarjan

गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका मुख्य मार्गावरून जाणार आहेत. मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक कोंडी, अपघात तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्य विसर्जन मार्ग ‘नो-एंट्री’
प्रियदर्शनी चौक–जटपुरा गेट–कस्तुरबा चौक–गांधी चौक–रामनगर रोड–संत केवलराम चौक–ईरई नदी (रामसेतू पूल) हा मुख्य मिरवणूक मार्ग गणेश विसर्जन सोहळा पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे.

नागपूर रोडवरून बल्लारशा किंवा मूलकडे जाणाऱ्या वाहनांना प्रियदर्शनी चौकाकडे प्रवेश दिला जाणार नाही. ही वाहने वरोरा नाका उड्डाणपूल–सावरकर चौक–बंगाली कॅम्प मार्गे पुढे जातील. त्याचप्रमाणे मूल किंवा बल्लारशाकडून नागपूरकडे जाणारी वाहनेही बंगाली कॅम्प–सावरकर चौक–वरोरा नाका नवीन उड्डाणपूल मार्गे वळविण्यात येणार आहेत.

शहरात येण्यासाठी पर्यायी मार्ग
नागपूरकडून शहरात येणाऱ्या जड वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना छोटा नागपूर–दाताळा चौक–देवाळा गाव–चोराळा टी-पॉइंट मार्गे बिनबा गेट किंवा पठाणपुरा गेटमधून शहरात प्रवेश करता येईल.

शहरातील नागरिकांनी नागपूर, वणी, घुग्घुस व गडचांदूरकडे जाण्यासाठी रहमत नगर, नगीना बाग, बिनबा गेट–चोराळा–दाताळा आदी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

बल्लारशा व मूलकडून शहरात येणाऱ्या वाहनांना बसस्टँड–एलआयसी कार्यालय–बगड खिडकी, जुनोना चौक तसेच प्रसन्ना पेट्रोल पंप–बाबुपेठ मार्गे शहरात प्रवेश करता येणार आहे. मात्र अंचलेश्वर गेटपर्यंतच प्रवेशाची मुभा राहणार आहे.

या मार्गांवर ‘नो पार्किंग’, ‘नो हॉकर्स झोन
विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जटपुरा गेट, कस्तुरबा चौक, गांधी चौक, रामनगर रोड, अंचलेश्वर गेट, जेल रोड चौक, दस्तगीर चौक, मिलन चौक, बजाज पॉलीटेक्निक परिसर, हिंदी सिटी हायस्कूल, मौलाना आझाद चौक, जयंत टॉकीज, छोटा बाजार चौक ते पाताळेश्वर मंदिर आदी मार्ग ‘नो पार्किंग’ व ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

या मार्गांवर नागरिक, व्यावसायिक तसेच गणेश मंडळांनी कोणतीही वाहने पार्क करू नयेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
मिरवणूक मार्गावरील रहिवाशांसाठी

पार्किंगची सोय
मुख्य मिरवणूक मार्गावर राहणाऱ्या नागरिकांकडे स्वतःच्या वाहनांसाठी पार्किंगची जागा नसल्यास जुबली हायस्कूलचे पटांगण आणि महानगरपालिकेजवळील पार्किंग येथे वाहने उभी करता येतील. मात्र मिरवणूक पूर्ण झाल्यानंतरच वाहने तेथून काढता येणार आहेत.

बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी ७ पार्किंग झोन
गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी चंद्रपूर शहरासह ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने सात ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे.

निर्धारित पार्किंग स्थळे :
चांदा क्लब ग्राउंड
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, वरोरा नाका
सेंट मायकल हायस्कूल, नगीना बाग
सिंधी पंचायत भवन, संत केवलराम चौकाजवळ, रामनगर
व्यायामशाळा ग्राउंड, पठानपुरा चौक
डी.एड. कॉलेज ग्राउंड, बाबुपेठ
महाकाली मंदिर ग्राउंड, चंद्रपूर
ही पार्किंग व्यवस्था २५ सप्टेंबर सकाळी ६ ते २६ सप्टेंबर सकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे.

मिरवणूक शांततेत पार पाडा; पोलिसांना सहकार्य करा
गणेश मंडळांनी अधिसूचनेत नमूद केलेल्या मिरवणूक मार्गाचे काटेकोरपणे पालन करावे. नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून निर्धारित पार्किंग स्थळांचा वापर करावा. अधिसूचनेतील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. Chandrapur Police

गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी गणेश मंडळे व नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी केले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular