चंद्रपूर :- इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग, राजुरा येथे आज बी.एससी. नर्सिंगच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांसाठी एका विशेष ‘ओरिएंटेशन प्रोग्राम’चे (अभिमूखीकरण कार्यक्रम) आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रातील करिअर, शैक्षणिक वातावरण, क्लिनिकल अनुभव आणि या क्षेत्रातील नैतिक मूल्यांची नवोदित विद्यार्थ्यांना ओळख करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. Orientation program for new B.Sc. Nursing students held at Kalyan College of Nursing
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संतोष शिंदे यांनी नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांचे मनोधैर्य वाढवले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्राचार्य शिंदे म्हणाले, “नर्सिंग ही केवळ एक पदवी नसून मानवतेची सेवा करण्याची एक महान संधी आहे. आरोग्य व्यवस्थेत परिचारिका/परिचारक हे महत्त्वाचे कणा मानले जातात. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच रुग्णांप्रती सहानुभूती, निष्ठा आणि व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावे.” त्यांच्या या प्रेरणादायी विचारांनी नवोदित विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण केली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके व यशस्वी नियोजन प्रा. अंकिता कराडे यांनी केले. त्यांनी प्रास्ताविक भाषणातून उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले आणि नर्सिंग क्षेत्रातील अभ्यासाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह भरला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, प्रयोगशाळा, वाचनालय, वसतिगृह नियम आणि संलग्न रुग्णालयांमधील क्लिनिकल प्रशिक्षणाची सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने व राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमानंतर नवीन विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या या प्रवासाबद्दल मोठा उत्साह पाहायला मिळाला.
