Gondwana University should implement changes to its curriculum structure in accordance with the National Education Policy 2020
चंद्रपूर :- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 चे मूलतत्त्व बहुविषयक शिक्षण आहे. पदवी वर्षाच्या प्रथम वर्षाला केवळ दोन विषयापुरती मर्यादा घालने हे या तत्वाशी विसंगत आहे. गोंडवाना विद्यापीठात पदवी प्रथम वर्षाला दोन विषय ठेवल्याने विद्यार्थी विषय पटसंख्या कमी होणे आणि शिक्षक अतिरिक्त ठरणे अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या असून या संदर्भात गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने पुढाकार घेतला असून पदवी प्रथम वर्षाला तीन विषय ठेवण्याची मागणी केली आहे. या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय गोरे आणि सचिव डॉ.विवेक गोर्लावार यांनी कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांना निवेदन दिले असून कुलगुरू महोदयांनी याची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी समिती गठित करण्याची अधिष्ठाता मंडळाला सूचना दिली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार गोंडवाना विद्यापीठात प्रथम वर्षाला दोन मेजर विषय घेऊन अभ्यासक्रम राबवल्या जात आहे त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठात तीन मेजर विषय घेऊन अभ्यासक्रम राबविला जात आहे. विद्यार्थ्यांना तीन विषय निवडण्याची संधी दिल्यास पुढील वर्षात योग्य मेजर – मायनर विषयाची निवड सुलभ होते. स्पर्धा परीक्षा व सर्वांगीण विकासासाठी बहुविषयक ज्ञान प्राप्त होते अतिरिक्त विषयाचे क्रेडिट अकॅडमी बँक मध्ये साठवून भविष्यात शैक्षणिक संधी वाढू शकतात.
विविध विद्याशाखेत प्रवेश घेताना नवीन विषय समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विषयाचे अधिक पर्याय आवश्यक आहे ही भूमिका यंग टीचर्स संघटनेने मांडली आहे. विद्याशाखनिहाय प्रथम वर्षाला तीन, दुसऱ्या वर्षाला दोन व तिसऱ्या वर्षाला एक मेजर विषय विद्यार्थ्यास निवडण्याची संधी दिल्यास अस्तित्वात असलेल्या प्राध्यापक मंडळीचा कार्यभार कमी होणार नाही तसेच विषयाला विद्यार्थी संख्या तिसऱ्या वर्षापर्यंत टिकून राहील अशी भूमिका यावेळी संघटनेच्या वतीने मांडण्यात आली. गोंडवाना विद्यापीठाने प्रथम वर्षाला तीन मेजर विषय ठेवून अभ्यासक्रम संरचनेत तात्काळ बदल करावा अशी मागणी गोंडवाना यंग टीचर्स संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.