Saturday, January 24, 2026
HomeAcb Trapमराठी भाषेचे जतन करण्याचा ध्यास घ्यावा - श्रीपाद प्रभाकर जोशी

मराठी भाषेचे जतन करण्याचा ध्यास घ्यावा – श्रीपाद प्रभाकर जोशी

Efforts should be made to preserve Marathi language – Shripad Prabhakar Joshi

चंद्रपूर :- जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये भाषेचा उपयोग अनिवार्य असून भाषा ही संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम आहे. माहिती, ज्ञान, विचार, भावना यांची देवाणघेवाण भाषेच्या माध्यमातूनच करता येते. त्यामुळे मराठी भाषेचे जतन करण्याचा ध्यास सर्वांनी घ्यावा, असे प्रतिपादन श्रीपाद प्रभाकर जोशी यांनी केले. Marathi Language Promotion Fortnight on behalf of District Information Office

जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय व मराठी सिटी हायस्कुल,चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने मराठी सिटी हायस्कुलच्या सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) विशाल देशमुख, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अशोक पुल्लावार, मराठी सिटी हायस्कुलच्या मुख्याध्यापिका महानंदा थोरात, हिंदी सिटी हायस्कुलच्या मुख्याध्यापिका रोशनी वर्भे, मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पेदोंर, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.

संतांनी मराठी भाषेला विकासाच्या प्रवाहात आणून ठेवले, असे सांगून श्रीपाद जोशी म्हणाले, मराठी भाषेला दोन हजार वर्षांपासूनचा इतिहास आहे. आपल्या भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या कालखंडात मराठीची पायाभरणी केली. संत तुकाराम महाराजांनी अभंग रचून भरभराट केली. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला वैभव प्राप्त करून दिले. कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. मुकुंदराजांनी विवेकसिंधू नावाचा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ लिहिला तर श्री.चक्रधर स्वामींनी मराठी भाषेत ‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ लिहिला होता. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका, ज्ञानेश्वरी लिहिली. मराठीतून अनेक काव्यरचना केल्या. संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा आदी संतांनी ओव्या व अभंगाच्या माध्यमातून मराठीचे महत्त्व रेखाटले असे ते म्हणाले. यावेळी श्री. जोशी यांनी विविध कविता संग्रह, साहित्य, अभंग, कालखंड, विविध क्षेत्रातील कवी, लेखक तसेच मराठी भाषेचा उगम ते इतिहास अधोरेखित केला.

उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख म्हणाले, आपल्या पूर्वजांकडून तयार केलेली भाषा अडीच हजार वर्षापासून सुरू आहे. एखाद्या भाषेचे जतन करण्यासाठी त्या भाषेचे ज्ञान असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचे जतन व संवर्धन व्हावं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचेही ते म्हणाले.

प्रास्ताविकेत बोलताना जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर म्हणाले, शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा राबविण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे. दैनंदिन व्यवहारात तसेच घरी देखील आपण मराठी भाषेचा वापर करतो. संवाद साधण्याचे उत्तम साधन भाषा आहे, असेही श्री. येसनकर म्हणाले.

यावेळी चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अशोक पुल्लावार, मराठी सिटी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका महानंदा थोरात यांनी आपले मत व्यक्त केले. तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार सुशील सहारे यांनी मानले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular