Manoj Jarange, who infiltrated Mumbai, will not be allowed to infiltrate OBCs: Dr. Ashok Jeevtode
चंद्रपूर :- मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मुंबईला आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या मनोज जरांगेचा जाहीर निषेध करीत स्थानिक दीक्षाभूमी चौकात आज (दि.२६) ला भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मनोज जरांगेच्या प्रतिमेला चप्पल मारून निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनात मोठ्या संख्येने ओबीसी समाजबांधव उपस्थित होते. Manoj Jarange’s protest in Chandrapur
मुंबईत घुसखोरी करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना ओबीसीत घुसखोरी करु दिल्या जाणार नाही. उठसुठ ओबीसीतून आरक्षण मागण्याचा जरांगे यांचा प्रयत्न नैराश्यातून होतो आहे. उपोषण हे लोकशाहीचे आयुध आहे, ते जरांगे ब्लॅकमेलिंग साठी वापरत आहेत. वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याची सुपारी जरांगे यांनी राजकीय प्रेरणेतून घेतली आहे. ज्या मराठा कुटुंबांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा नकार नव्हता, परंतु सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर आमचा कायम विरोध असणार आहे. जरांगे यांची मागणी घटनाबाह्य आहे, त्यांची एकाधिकारशाही सुरु आहे. आंदोलनाच्या माध्यमातून सामान्य जनतेस वेठीस आणणाऱ्या मनोज जरांगेचा जाहीर निषेध आहे. आम्ही जिवंत असे पर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध असेल, राज्य सरकारने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास, आम्ही राज्य सरकारच्याही विरोधात जावू, असे डॉ. अशोक जीवतोडे या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून बोलले.
या अगोदर अनेक वेळा विविध आयोग व सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला फेटाळले आहे. संविधानिक तत्वावर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय समजणे हे समानतेच्या सिद्धांताचे उल्लंघन आहे. १९७८ ते २०१० या काळात अनेक मराठा समाजातून आलेले नेते राज्याचे मुख्यमंत्री झाले, पण यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही व काही सर्वेक्षणे केली नाहीत. हा सर्व इतिहास मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात आहे, असे सर्व असताना जरांगे यांचे आंदोलन व मागणी हेकेखोरीचा कळस आहे. त्यामुळे या जरांगेमुळे दोन समाजात द्वेष वाढत आहे. हे भविष्याच्या सामाजिक सौहार्दासाठी घातक आहे. त्यामुळे जरांगेला अटक करुन महाराष्ट्रातून तडीपार करावे, असेही डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.
यावेळी आंदोलनातून मनोज जरांगेचा निषेध करण्यात आला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, मनोज जरांगेचा निषेध असो, जय ओबीसी, अशा घोषणा देण्यात आल्या. जरांगेच्या निषेधाचे फलक उंचावण्यात आले. जरांगेच्या प्रतिमेला चप्पल मारण्यात आली. आंदोलनात मोठ्या संख्येने ओबीसी युवक व समाजबांधव होता.