Highway Police Chandrapur Delivers a Stellar Performance; Honored with the First Prize for Outstanding Achievement
चंद्रपूर :- जिल्ह्यातील महामार्गांवर अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने प्रभावी उपाययोजना राबविणाऱ्या महामार्ग पोलीस चंद्रपूरने सन २०२५-२६ या वर्षात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग, नागपूर यांच्या वतीने चंद्रपूर युनिटला सर्वोत्तम कामगिरीचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला असून प्रभारी अधिकारी माया चाटसे यांचा सन्मान करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. Highway Police Chandrapur Honored with First Prize for Outstanding Performance

महामार्ग सुरक्षा पथकाकडून नियमित पेट्रोलिंग, अपघातस्थळी तात्काळ भेट, तसेच मोटार वाहन कायद्यानुसार कसूरदार चालकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. अत्याधुनिक इंटरसेप्टर मशिन, डिव्हाईस व ब्रेथ अॅनालायझर यांच्या सहाय्याने सन २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.
👉 ठळक आकडेवारी (सन २०२५)
एकूण केसेस : २०,३९६
एकूण दंड वसुली : ₹१,७०,७९,७००
ड्रंक अॅन्ड ड्रायव्ह प्रकरणे : ६४ चालकांवर कारवाई
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या ६४ चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली आहेत. तसेच, दंड न भरलेल्या वाहनचालकांविरुद्ध खटले/इस्तेगाशे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिकाधिक अनपेड प्रकरणे न्यायालयात सादर केली जात आहेत.
दरम्यान, अपघातांचे मुख्य कारण म्हणून दारू पिऊन वाहन चालविणे हे समोर आले आहे. त्यामुळे २०२६ मध्ये ड्रंक अॅन्ड ड्रायव्हविरोधात अधिक कडक मोहीम राबविण्यासाठी नवीन ४ ब्रेथ अॅनालायझर मशिन उपलब्ध करण्यात आले आहेत.
🚨 नागरिकांसाठी महामार्ग पोलीसांचे आवाहन
दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे अनिवार्य
चारचाकी चालकांनी सीटबेल्ट लावणे
वाहनास HSRP नंबर प्लेट बसविणे
लायसन्स, इन्शुरन्स व इतर कागदपत्रे सोबत ठेवणे किंवा DigiLocker अॅपमध्ये अपलोड करणे
वेगमर्यादा व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे
दारू पिऊन वाहन चालविणे टाळावे
अपघात झाल्यास नागरिकांनी तात्काळ १०८ अॅम्ब्युलन्स सेवा किंवा १०३३ टोल फ्री हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन महामार्ग पोलीस मदत केंद्र, चंद्रपूरकडून करण्यात आले आहे.
महामार्ग पोलीसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होत असून नागरिकांकडूनही त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.