चंद्रपूर :- शिक्षणाची आवड आणि मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल तर परिस्थिती कधीही आडवी येत नाही, याचाच प्रत्यय घडवणारा उपक्रम आज पार पडला. इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या अजिंक्य दिवसे या गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणाला गती देण्यासाठी ‘नाते आपुलकीचे बहुउद्देशीय संस्थे’च्या वतीने व डॉ. सचिन धगडी यांच्या पुढाकाराने आज, २६ जुलै २०२६ रोजी शाळेत जाण्या-येण्यासाठी सायकल भेट देण्यात आली.
अजिंक्यची आई घरकाम करून अत्यंत कष्टाने कुटुंबाचा सांभाळ करते. कौटुंबिक परिस्थिती प्रतिकूल असूनही अजिंक्यने अभ्यासातील आपले सातत्य आणि हुशारी टिकवून ठेवली आहे. त्याला रोज शाळेत जाण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि शैक्षणिक साहित्याची गरज ओळखून ‘नाते आपुलकीचे’ संस्थेने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मदतीचा हात पुढे केला.
या सायकल वाटप कार्यक्रमास डॉ. सचिन धगडी, संस्थेचे अध्यक्ष संतोष ताजणे, उपाध्यक्ष किसन नागरकर, सचिव प्रा. प्रमोद उरकुडे, सदस्य महेश गुंजेकर, मनोहर डवरे, हितेश गोहोकार, जितेंद्र मशारकर आणि जनार्दन धगडी उपस्थित होते.
“होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना वेळेवर प्रोत्साहन आणि मदत मिळाली, तर ती मुले भविष्यात नक्कीच मोठे यश संपादन करू शकतात. अजिंक्यच्या शैक्षणिक प्रवासात लहानसा हातभार लावता आला याचा आनंद आहे,” असे मत यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. संस्थेच्या या उपक्रमाबद्दल अजिंक्यच्या आईने संस्थेचे मनापासून आभार मानले.